स्वतःची आवड, अभ्यासाची क्षमता आणि घरातल्या परिस्थिती नुसार योग्य अभ्यासक्रम निवडा!
दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना, फेसबुक लाईव्ह मार्फत मार्गदर्शन!!
ठाणे
समता विचार प्रसारक संस्थेने, एकलव्य सक्षमीकरण योजने अंतर्गत, दहावी नंतर काय ? अर्थात व्यवसाय मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. लोकवस्तीतील १०वी एसएससी च्या विद्यार्थ्यांनी सध्याच्या लॉकडाउन च्या काळात हतोत्साहित न होता, येत्या महिना अखेरीस लागणाऱ्या दहावीच्या निकालाआधी पुढील शिक्षणाबाबतची पूर्वतयारी पूर्ण करावी. स्वतःची आवड, आपली अभ्यासाची क्षमता आणि घरातल्या आर्थिक परिस्थिती नुसार योग्य अभ्यासक्रम निवडावा, असे आवाहन दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना, फेसबुक लाईव्ह मार्फत करण्यात आले. फेसबुक लाईव्ह असल्यामुळे ४११ विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा कार्यक्रम लाईव्ह बघितला. ३६१८ लोकांनी या कार्यक्रमास भेट दिली, असे या कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन करणाऱ्या प्रकेत ठाकूर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन लतिका.सु.मो, निलेश दंत व अजय भोसले यांनी केले. डॉ. संजय.मं.गो. जगदीश खैरालिया, मनीषा जोशी, अनुजा लोहार, सुनील दिवेकर, मीनल उत्तूरकर आदी या कार्यक्रमात उपस्थित होते.
११ वीला प्रवेश घेण्यातही कोण कोणती प्रक्रिया असते व कशा प्रकारे आपण महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतो तसेच दहावी झाल्यानंतर आपण नक्की कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा अर्थात कला, विज्ञान की वाणिज्य, ह्यामध्ये त्या त्या शाखेत कोणते विषय असतात, कोणते विषय सोपे व अवघड आणि कोणत्या विषयांनी आपण पुढे जाऊ शकतो तसेच तंत्रज्ञानाधारित इंजिनीरिंग डिग्री आणि डिप्लोमा, एमसीव्हीसी, आय टी आय, होम सायन्स, हॉटेल व्यवस्थापन, बीएड, डीएड, पोलीस भरती अशा विविध पर्यायांची यावेळी सविस्तर माहिती शैलेश मोहिले यांनी दिली. यंदा लॉक डाउन मुळे प्रत्यक्ष घराबाहेर न पडता ऑन लाईन पद्धतीने कॉलेज प्रवेश होणार आहेत. त्याचीही सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
दहावी नंतर कोण कोणते कोर्सेस असतात? कमी कालावधीचे व लवकर रोजगार मिळवून देणारे कोर्सेस आहेत का? ११ वी ला प्रवेश घेतांना कशा प्रकारे काळजी घ्यायची? कशा प्रकारे त्याचा फ्रॉम भरायचा? अशा अनेक प्रश्नांचे निवारण करण्यात आले. या सत्रात करियर समुपदेशक सतीश सोनावणे आणि शैलेश मोहिले यांनी मार्गदर्शन केले. सध्या तंत्रज्ञान आणि काम कारण्याच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. कोरोना नंतर आयुष्य कसे असेल आणि कोणत्या क्षेत्रात संधी असेल याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे सांगत सतीश सोनावणे यांनी पुढे सांगितले की उपलब्ध पर्याय नीट समजून घेऊन आपल्याला योग्य दिशा कोणती याचा निर्णय विद्यार्थ्यांनी करायला हवा. दहावी एसएससी नंतर वोकेशनल आणि प्रोफेशनल असे दोन मार्ग आहेत. व्होकेशनल अभ्यासक्रमात प्रत्यक्ष हाताने काम करण्यावर भर असतो. हे अभ्यासक्रम लवकर संपतात आणि आपल्याला लवकर जॉब मिळू शकतो. याउलट, प्रोफेशनल अभ्यासक्रमात, शास्त्रीय आणि गणिती अभ्यास अधिक असतो आणि त्यात पदवी मिळण्यास किमान ५ वर्षे अभ्यास करावा लागतो.
0 टिप्पण्या