Top Post Ad

आणीबाणी, भाजप आणि सद्यस्थिती !

आणीबाणी, भाजप आणि सद्यस्थिती !


- जयंत माईणकर


● आरएसएसचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आणीबाणीच्या  काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जेलमधून अनेक माफीपत्रे लिहिली.
 २० कलमी कार्यक्रमाला आणि मुख्यत्वे मुस्लिम धर्मातील कुटुंब नियोजनाला पाठिंबा दिला होता. आणि जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाला विरोध दर्शविला होता.
पण इंदिरा गांधींनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही," 
ही वाक्य लिहिली आहेत  सध्याचे भाजपचे नामनियुक्त खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी  आजपासून २० वर्षांपूर्वी हिंदू या इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात.


● आणीबाणी विरोधात संघ परिवार अग्रस्थानी होता असा संघ परिवारातील नेत्यांचा दावा किती पोकळ आहे हे सिद्ध करण्यासाठी  वरील वाक्य पुरेसे आहे. स्वातंत्र्य लढ्यातील संघ परिवाराचा सहभाग होता का,, असला तर कितपत होता, आणि त्यांचे अनेक नेते , कार्यकर्ते हे इंग्रजांचे खबरी होतेय आणि अशा प्रकारच्या चर्चा आणि आरोप नेहमी केले जातात.


● खुद्द वाजपेयींनी  स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात आपण विश्वविद्यालयात शिकत होतो त्यामुळे कुठल्याही आंदोलनात क्रियाशील सहभाग  नव्हता, अस   एका भाषणात सांगितले आहे. अर्थात त्यांच्यावर इंग्रजांसाठी हेरगिरी केल्याचाही आरोप केला गेला होता.


● पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात  स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी सर्वात जास्त बलिदान संघ परिवाराने केल्याचा उल्लेख करत आणीबाणीतील संघ परिवाराच्या सहभागाचा दाखला दिला होता.


● पण जर डॉ सुब्रमण्यम स्वामी यांचं वाक्य प्रमाण मानलं तर  स्वतः सरसंघचालक देवरस आणि जनसंघ नेते वाजपेयी यांनी अनेक वेळा इंदिरा गांधींनी माफी मागितली होती.
मिसामध्ये स्थानबद्ध असताना वाजपेयींना वेळोवेळी पॅरोल का मिळायचा याच्या मागचं हेही एक कारण असल्याचं म्हटलं जातं.


● आणि जर ही वस्तुस्थिती असेल तर महाराष्ट्रासहित अनेक मध्य प्रदेश आदी  भाजप शासित राज्यात आणीबाणी काळात अटक केलेल्याना सुरू केलेली पेन्शन ही संपूर्णपणे अयोग्य म्हटली पाहिजे. कारणआणीबाणीला विरोध केवळ संघ परिवाराने केला हे म्हणणं अयोग्य आहे.


● बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालाल संपुर्ण क्रांती आंदोलन आणि गुजरातमधील  नवनिर्माण आंदोलन यामध्ये संघाचा सहभाग काहीच नव्हता.● जॉर्ज फर्नांडिस आदी समाजवादी मंडळी, मोरारजी देसाई यांच्यासारखे पूर्वाश्रमीचे काँग्रेसजन, चरणसिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय लोकदल  आणि अनेक प्रादेशिक पक्षांनी आणीबाणीला विरोध केला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही आणीबाणी ला विरोध होता. 


● मिसाखाली केवळ संघ स्वयंसेवक अटकेत होते  हे म्हणणं म्हणजे इतर समाजवादी, काँग्रेस फॉर डेमोक्रॅसी  आणि समांतर काँग्रेसच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. कारण याच सर्व पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थपना केली. 


● एक प्रकारे तात्त्विक मतभेद बाजूला ठेऊन  केवळ काँग्रेस आणि आणीबाणी विरोध या मुद्द्यावर कम्युनिस्ट वगळता सर्व राजकीय पक्ष एकत्र आले होते. एकूण जनता पक्षाचे २९८ खासदार होते त्यातील ९६ पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे असल्याचा  दावा भाजपकडून केल्या गेला. पण याचा सरळ अर्थ असा की उर्वरित दोन तृतीयांश संघ परिवारातील नव्हते.


● जी गोष्ट खासदारांची तीच कार्यकर्त्यांची किंवा मिसा आणि भारत सुरक्षा कायद्याखाली अटक झालेल्या व्यक्तींची. अमनेस्टी इंटरनॅशनल  या संस्थेच्या अहवालात एकूण १.४० लाख लोकांना  पकडल्याच नमूद केलं होतं त्यातील ४०,००० शीख समुदायाचे असल्याच सांगितलं जातं. पण या  एक लाख व्यक्तींपैकी जवळपास तीन चतुर्थांश पूर्वाश्रमीच्या काँग्रेसचे, समाजवादी किंवा प्रादेशिक पक्षांशी संलग्न होते. म्हणजे एकूण अटक झालेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा संघ स्वयंसेवकांचा सहभाग फार कमी होता.


● असं असूनही आपलाच आणीबाणी संघर्षात सहभाग मोठा होता हे लोकांच्या माथी मारण्यात  यशस्वी ठरले याला दोन कारण आहेत.
जनसंघ किंवा भाजपच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सारखी अफवा पसरविण्यात तरबेज असलेली संघटना तर दुसर कारण विघटित झालेला समाजवादी परिवार.


जनता पक्षात विलीन झालेल्या  समाजवादी पक्षाची आज नऊ शकलं झाली आहेत. आणि आपापल्या राज्यात किंवा विशिष्ट भागात त्यांचं प्राबल्य आहे. आणि जवळपास हे सर्वच पक्ष भाजप किंवा काँग्रेसच्या  साथीने राज्यात सरकार बनवितात.


● याउलट भाजपने संघाच्या साह्याने आपला एकसंधपणा कायम ठेवला आणि राम जन्मभूमी आंदोलनाने देशातील पकड घट्ट केली.


● उत्तर भारतात आणि केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपने आणीबाणी काळात तुरुंगात गेलेल्या आपल्या स्वयंसेवकांसाठी पेन्शन योजना दिली. या योजनेचा लाभ केवळ संघ स्वयंसेवकानाच मोठ्या प्रमाणात मिळाला.


● समांतर काँग्रेस किंवा काँग्रेस फॉर डेमोक्रॅसी  या पक्षाचे बहुतेक नेते, कार्यकर्ते  पुन्हा काँग्रेस मध्य परतले. मात्र बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आणि गुजरातमधील नवनिर्माण आंदोलन यात सामील झालेल्या अनेक समाजवादी कार्यकर्त्यांच्या नशिबी मात्र कुठलाही फायदा फारसा दिसला नाही.


● समाजवाद्यांच्या खांद्यावर बसून मोठे झालेले संघ परिवारातील नेते जयप्रकाश नारायण यांना आता एक अयशस्वी राजकारणी म्हणवतात.
आपल्या वाक्याच्या समर्थनार्थ ही नेते मंडळी जनता पक्षाच्या फसलेल्या प्रयत्नाचा दाखल देतात. पण यावेळी भाजपची मंडळी हे विसरतात की जयप्रकाश नारायण यांनी कुठलाही रक्तपात होऊ न देता केंद्रात पहिल्यांदा सत्ताबदल करून दाखवला.
 याउलट भाजप राम जन्मभूमी आंदोलन आणि गोध्रा दंगलीत मोठ्या प्रमाणात रक्तपात झाल्यानंतरच भाजप सत्तेवर पोचलेला आहे.


● २०१४ पासूनची देशातील परिस्थितीचा विचार केला तर आणीबाणीहुन भयावह आणि लोकशाहीला घातक अशी परिस्थिती सध्या आहे असं दिसतं. गेल्या सहा वर्षात गंभीर गुन्ह्याचे आरोप असलेल्या आणि न्यायालायाने शिक्षा दिलेल्या नऊ जणांना मोदी सरकारने मुक्त केलं आहे.
 या नऊ जणात मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि सध्याच्या खासदार प्रज्ञा सिंग, गुजरातच्या माजी मंत्री डॉ माया कोडनानी,  इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणातील आरोपी उच्च पोलीस अधिकारी डी जी वंजारा, शाहीन बागेत आंदोलनासाठी बसलेल्यांवर गोळीबार करणाऱ्या कपिल बिसला आणि जम्मू काश्मीरचे वादग्रस्त पोलीस ऑफिसर दविंदर सिंग यांचाही समावेश आहे.


● याउलट १९८९ सालच्या कोठडी मृत्यू प्रकरणात संजीव भट्ट यांच्यासारखे अधिकारी आज  जन्मठेप भोगत आहेत.
 गुजरातमधील दुसरे एक आय ए एस ऑफिसर प्रदीप शर्मा हेही तुरुंगाची हवा खाऊन आले  आहेत. आणि त्याचा संबंध  स्नुपगेट प्रकरणातील मुलीशी असल्याचं म्हटलं जातं.


● एकूण आणीबाणीला खरा विरोध आम्हीच केला असं म्हणण्याचा आव आणत आणि आपल्या कार्यकर्त्यांना पेन्शन मिळवून देत, गेली सहा वर्षे मोदींनी देशात आणीबाणीहुन बिकट परिस्थिती निर्माण केली आहे.


● नोकरशहा आपला भाजपविरोध नोंदवायला घाबरतात.  मिडिया हाऊसेस मोदी धार्जिण्या व्यक्तींकडून खरेदी केल्या जात आहेत. मोदींविरोधी पत्रकारांना नोकरीला मुकावे लागत आहे. म्हणजे आणीबाणीला तथाकथित विरोध करणाऱ्यांनी आज आणीबाणी न लावता आणीबाणीसदृश परिस्थिती आणून ठेवली आहे. आणि याच अवस्थेत देशाला पुढील चार वर्षे काढायची आहेत.


तूर्तास इतकेच!


वरील लेख देशोन्नती, ऐक्य, कृषीवल या वृत्तपत्रात,
तसाच इम्पॅक्ट 24 आणि बलशाली भारत या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे.
 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com