बौध्द लेण्यांचे संरक्षण सरकारने करावे

बौध्द लेण्यांचे संरक्षण सरकारने करावे!


                          प्रेमरत्न चौकेकर 
                  
           केरूमाता बौध्द लेणी ही पाचव्या शतकातील लेणी आहेत. ही लेणी कोंबडभुजे नावानेही  प्रसिद्ध आहेत. बौध्द साहित्यात या जागेचा उल्लेख खारपुसे खारिवली अशा प्रकारे आला आहे.  तसा उल्लेख सरकारी  Gazzetes मध्ये आला आहे.
ही लेणी गेल्या अनेक वर्षांपासून केरूमाता मंदिर या नावाने ओळखली जातात. आगरी कोळी भंडारी कराडी या ओबीसी जाती समूहांनी या लेण्यांना केरूमाता देवीचे मंदिर म्हणून पूजापाठ करीत आजपर्यंत जपले आहे.  अन्यथा नैसर्गिक आपत्ती मुळे किंवा मानवी घडामोडींमुळे ही लेणी नष्ट होऊ शकली असती हे विसरून चालणार नाही.
          बौध्द धम्माच्या पडझडीच्या काळात असंख्य बौध्द भिक्खु व सामान्य बौध्द जनता यांची प्रचंड प्रमाणात हत्याकांडे करण्यात आली. त्यामुळे बुद्ध आणि त्यांचा धम्म यांची  मूलभूत शिकवण यांचा प्रचार, प्रसार व आचरण करणारे कुणी शिल्लक राहिले नाही. याच काळात बौध्द धम्म व बौध्द संस्कृतीचे मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणी करण करण्यात आले. बौध्द विहारांचे रूपांतर ब्राह्मणी मंदिरात करण्यात आले. बुद्धाच्या मुर्त्त्यांची तोडफोड केली गेली. अनेक ठिकाणी बुद्ध मुर्तीच्या ठिकाणी काल्पनिक  देव देवता बसविल्या गेल्या आणि या विहारांमधून ब्राह्मणी पूजा अर्चा सुरू झाल्या. 
           अशा कठीण परिस्थितीत सुध्दा धम्म धारण करण्याचे काम व आपापल्या परीने धम्माच्या प्रचाराचे कार्य त्या काळात कर्मकारांनी व त्यांच्या श्रेणींनी (संघटनांनी) धम्म श्रद्धेच्या जाणिवेतून केले. या कारागिरांच्या समूहांनाच पुढे ब्राह्मणी धर्म संस्कृतीने जाती व्यवस्थेमध्ये रुपांतरीत केले.  हेच जनसमूह आज भारतीय संविधानानुसार ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय म्हणून ओळखले जातात. हे पूर्वीचे बौध्दच आहेत.
           पूर्वाश्रमीच्या बौध्द जनसमूहांना बौध्द म्हणून टिकविण्यासाठी या देशात बुद्ध आणि त्यांच्या  धम्माचे प्रचारक शिल्लक राहिले नाहीत. त्यातच ब्राह्मणी धर्म संस्कृती व धर्म मार्तंडाना राजाश्रय मिळत गेला. त्यामुळे जन सामान्यांच्या मन मष्तिकांमधून बुद्ध व त्यांचा धम्म विस्मृतीत गेला. आज ब्राह्मणी धर्म संस्कृतीच्या पूर्णपणे आधिन झालेल्या शुद्र व अतिशुद्रांना म्हणजेच SC ST OBC या भारताच्या बहुसंख्यांकांना आपण पूर्वाश्रमीचे बौध्द आहोत हे सांगूनही पटत नाही. 
           अशाप्रकारे या सर्व पूर्वाश्रमीच्या बौद्धांना पुन्हा बौध्द धम्मात आणण्याचे महान कार्य आजच्या बौध्दांना करावेच लागेल. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 च्या अशोक विजयादशमी म्हणजेच 14 ऑक्टोबर या दिवशी आम्हाला बुद्ध व त्यांचा धम्म देवून बौध्द केले आणि आमच्या आयुष्याचे सोने केले. आता हा कारवा पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर म्हणजेच आजच्या बौद्धांवर आहे.  
          आज केरूमाता बौध्द लेणी बाबतीत परिस्थिती खूपच बदलली आहे.  तिथे बसविलेल्या देवीची मुर्ती आगरी कोळी भंडारी आणि एकूणच स्थानिक भूमीपुत्रांनी  सन्मानपूर्वक तिथून हलविली आहे.  सिडको, राज्य सरकार व नवीन विमानतळ प्राधिकरण यांनी केरूमाता मंदिरासाठी दहा गुंठे जमीन व काही रक्कम मंदिराच्या पुनर्वसनासाठी दिली आहेत. केरूमाता आईच्या उपासकांसाठी हा प्रश्न मार्गी लागला आहे  व सुटला आहे!
           आता केरूमाता बौध्द लेणी व तीचे संरक्षण हा महत्त्वाचा प्रश्न शिल्लक आहे.  हा प्रश्न बौध्दांचा आहे.  पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार यानी पुरावशेष संरक्षण कायदा, 1958 नुसार ही लेणी नष्ट न होऊ देता संरक्षित करण्याचा आदेश सिडको व  विमानतळ प्राधिकरणाला दिला आहे. तरीही सिडको व नवीन विमानतळ प्राधिकरण यांनी ही केरूमाता लेणी म्हणजेच कोंबडभुंजे बौध्द लेणी उध्वस्त करण्याची बेकायदेशीर कारवाई सुरू केली आहे.  ती ताबडतोब थांबविण्याचे आदेश राज्य सरकारने आपल्या अखत्यारीत सिडको व नवीन विमानतळ प्राधिकरण यांना तातडीने देण्याची आवश्यकता आहे.
          पुरावशेषांचे संरक्षण करणे, पुनरुज्जीवन करणे, पुनर्घटन करणे हे राज्य व केंद्र सरकार यांचे घटनादत्त तसेच सांस्कृतिक कर्तव्यच आहे. हे कर्तव्य सरकारने पार पाडावे अशी बौध्द समाजाची मागणी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad