कोरोनाच्या महामारीचा फटका मीठ व्यवसायालाही
वसई :
कोरोनाच्या महामारीचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. अनेक छोटे मोठे उद्योग संकटात आले आहे. मजूरांनी राज्य सोडले आहे. वसईतील मीठ कामगार व उत्पादकांनाही याचा फटका बसला आहे. मिठाचे उत्पादन मागील तीन महिने सलग बंद राहिल्याने यंदा केवळ २५ टक्केच उत्पादन झाले असल्याची माहीती मिळत आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळे, माकूनसार, माहीम, वसई पूर्व व पश्चिम आदी खाडी व किनारपट्टीचा ग्रामीण व शहरी भाग मिठागरांसाठी ओळखला जातो.शेती व मासेमारीप्रमाणे वसईतही अनेक वर्षांपासून पारंपरिक मीठ उत्पादनाचा व्यवसाय केला जातो. पालघर जिल्ह्यातील वसई-डहाणू या पट्ट्यात १५ ते १८ हजार एकरांवर मिठाचे उत्पादन होते.
वसईतले अनेक स्थानिक भूमिपुत्र येथे मिठाचे उत्पन्न घेऊन आपली उपजीविका करत असतात. वसई-विरारमधील १५७५ एकर जागेवर मीठ उत्पादन घेतले जाते. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यात हे काम केले जाते. मिठागरात काम करण्यासाठी दरवर्षी विविध ठिकाणांहून मजूर येत असतात. त्यांच्या साथीने मिठागरात पाणी, मीठ खेचणे, योग्य ती मशागत करणे, तयार झालेले मीठ उचलणे अशी कामे केली जातात. मात्र या वर्षी कोरोनामुळे मिठागरात काम करणारे कामगार मार्चपासूनच निघून गेले होते. त्यामुळे वसई-विरारमधील मिठागरे ओस पडली होती.
0 टिप्पण्या