Trending

6/recent/ticker-posts

रबाळे एमआयडीसीमधील 'सुल्झर पंप्स्  या कंपनीत कोरोनाग्रस्त रुग्णांत वाढ

नवी मुंबईच्या 'सुल्झर पंप्स्' कंपनीच्या निर्दयी व्यवस्थापनामुळे, पंचवीसहून अधिक कामगार कोरोनाबाधित 
प्रशासनाची 'अर्थ'पूर्ण डोळेझाक... कामगारांमध्ये संतापाचे वातावरण...
 
नवी मुंबई


महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, काही अटी-शर्ती घालून अत्यावश्यक सेवा प्रकारात येणाऱ्या आस्थापनांना, कमीतकमी मनुष्यबळाचा वापर करून २० एप्रिलपासून, उत्पादन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु, असे असतानाही अत्यावश्यक सेवेच्या कोणत्याही निकषात मोडत नसतानादेखील, केमिकल प्रोसेस पंपाचे उत्पादन करणाऱ्या नवी मुंबईच्या रबाळे एमआयडीसीमधील 'सुल्झर पंप्स्  या कंपनीने मात्र, १५ एप्रिल-२०२० रोजीपासून उत्पादन घेण्यास सुरुवात करून कामगारांवर दबाव टाकून त्यांना सक्तीने कामावर येण्यास सांगितले. केमिकल प्रोसेस पंपाचे उत्पादन करणाऱ्या या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापनाच्या निर्दयी हलगर्जीपणामुळे कोरोना आजाराने थैमान घातले असून, सुमारे २३ ते २५ कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने, नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यात एकच खळबळ उडाली आहे.कंपनीतील मान्यताप्राप्त असलेल्या 'सुल्झर पंप्स् एम्प्लॉईज युनियन' (सेऊ) या कामगार संघटनेला यासंदर्भात कुठेही विश्वासात घेतले नाही, उलट आजतागायत अत्यावश्यक सेवेचे मिळालेले 'तथाकथित' प्रमाणपत्र व ते मिळण्यासाठी शासनाला दिलेले स्व-घोषणापत्रदेखील, कामगारांना किंवा युनियनला सादर करण्याचे साधे सौजन्यही व्यवस्थापनाने दाखविलेले नाही. परिणामी, 'सोशल डिस्टन्सिंग'चा पुरता बोजवारा उडून, सुरुवातीला अवघ्या दोन कामगारांना झालेली कोरोनाची लागण, आता तब्बल पंचवीसपर्यंत येऊन ठेपलेली आहे. याबाबत सुरुवातीपासूनच युनियनने कामगारांच्या वतीने कामगार कार्यालय, ठाणे जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका व पोलीस आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे कामगारमंत्री यांकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केलेल्या आहेत, पण तरीदेखील अद्यापपर्यंत प्रशासनाने यावर कोणतीही दखल घेतलेली नसल्याने, कामगारांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


२ जून रोजी 'सुल्झर' कंपनीच्या स्टोअर डिपार्टमेंटमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. केंद्र व राज्य सरकार, तसेच आय.सी.एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल असोसिएशन) यांच्या निर्देशानुसार, बाधित रुग्णांच्या संदर्भात कामगार-कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन, त्यांना १४ दिवस विलगीकरण करणे महत्त्वाचे होते, परंतु कंपनी व्यवस्थापनाने याची दखलच घेतली नाही. परिणामी याच डिपार्टमेंटमधील कोरोना रुग्णांची संख्या पुढे चार इतकी झाली. अशा परिस्थितीत कामगारांचा वाढता रोष लक्षात घेता, व्यवस्थापनाने ५ व ८ जून या दिवशी नवी मुंबईतील गगनगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना चाचणी केली. कंपनीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर,  व्यवस्थापनाने कामगार-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही ठोस सकारात्मक पाऊल उचलले नाही. त्याचीच परिणीती म्हणून, आतापर्यंत 'सुल्झर पंप्स्' कंपनीतील एकूण २३ ते २५ कामगार कोरोनाग्रस्त झालेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कर्तव्यतत्पर भावनेने कामावर उपस्थित राहूनदेखील, कामगारांना अवहेलना, मानसिक व शारीरिक पिळवणूक सहन करावी लागत आहे. यावर ठोस सकारात्मक पाऊल न उचलणाऱ्या व्यवस्थापनाच्या क्रूर, निष्ठुर व बेकायदेशीर आणि अन्यायकारक निर्णयाविरोधात न्यायालयीन लढा उभारावा  लागेल,तसेच 'कामगार शोषण विरोधी चळवळ' सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार कामगारांच्या वतीने, 'सुल्झर पंप्स् एम्प्लॉईज युनियन' या कामगार संघटनेने व्यक्त केला आहे.


  


Post a Comment

0 Comments