रेशनदुकानदारांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना
भिवंडी
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागातील तब्बल ८३ हजार १९० शिधावाटप पत्रिकेवरील २ लाख ८७ हजार ५४२ नागरिक हे मोफत तसेच रास्तभाव दराने धान्य खरेदी पासून वंचित आहेत. राज्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांनी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली १ जूनपासून पुकारलेले बेमुदत बंद आंदोलन अद्याप सुरूच आहे. या आंदोलनाचा फटका सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेला बसत आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे नागरीकांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना या संपामुळे गोरगरीब, आदिवासी आणि कष्टकरी कुटुंबियांची कुचंबना होत आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भराई व उतराई हमाली दुकानदारांकडून घेतली जात नाही. अपवाद फक्त ठाणे व पालघर जिल्ह्यातील दुकानदारांकडून ती वसूल केली जाते. त्याचप्रमाणे पंतप्रधान योजनेतील मोफत धान्य वितरण कामाचा मोबदला मिळावा, तामिळनाडू राज्य शासनाच्या धोरणानुसार दुकानदारांना मानधन व प्रत्येक दुकानदारास ५० लाखांचा विमा सुरक्षा कवच मिळावा, या मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपामध्ये भिवंडी तालुक्यातील १५७ दुकानदार, तालुका अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले आहेत.
0 टिप्पण्या