Trending

6/recent/ticker-posts

वाशी येथिल सिडको एग्झिबिशन सेंटरमधील कोरोना रुग्णालयाची सेवा आजपासून सुरू

वाशी येथिल सिडको एग्झिबिशन सेंटरमधील कोरोना रुग्णालयाची सेवा आजपासून सुरू

 

 ठाणे

 

आजपासून (१२ जुन)  वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेले रुग्णालय रुग्णसेवेत दाखल होत आहे. या रुग्णालयात ६० डॉक्टर्स, २५० नर्स, ३५० बहुउद्देशीय कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात करणार येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नवी मुंबईतील करोना रुग्णांचा बरा होण्याचा दर ६० टक्के असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत, अशा प्रकारच्या रुग्णालयामुळे आरोग्यसेवेला अधिक बळ मिळून रुग्णांवर अधिक चांगल्या प्रकारे उपचार करता येतील, असे ते म्हणाले. या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून हे तात्काळ रुग्णसेवेत दाखल करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (११ जुन)  नवी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले. टोपे यांच्या समवेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी  या रुग्णालयाची पाहाणी केली. या ठिकाणी ५० बेड्सचे आयसीयू युनिट उभारून व्हेंटिलेटरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

 

नवी मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेच्या सक्षमीकरणासाठी आणि पुरेशा प्रमाणात बेड्स व अन्य सुविधा उपलब्ध असावी, यासाठी  सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून १२०० खाटांचे हे रुग्णालय उभारण्यात आले असून येथे ऑक्सिजन आणि नॉन-ऑक्सिजन बेड्ससह एक्स रे, डायलिसिस, पॅथॉलॉजी लॅब आदी सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत.  या ठिकाणी आणखी जागा उपलब्ध असून गंभीर रुग्णांवर उपचार व्हावेत, यासाठी ५० बेड्सचे आयसीयू युनिट उभारण्याचे निर्देश  नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना देण्यात आले आहेत.. यासाठी आरोग्य खात्याने मदत करावी, अशी विनंतीही शिंदे यांनी राजेश टोपे यांना केली. याप्रसंगी खासदार राजन विचारे, स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, विजय नाहटा, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व अन्य अधिकारी उपस्थित होते.

 


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या