सभागृह अथवा खुल्या मैदानांमध्ये लग्न समारंभांच्या आयोजनास परवानगी
नागपूर.
कोरोना संसर्गामुळे सामूहिक, धार्मिक, सामुदायिक सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी शक्य तेथे गर्दी टाळण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केवळ घरांमध्येच लग्न समारंभांच्या आयोजनास परवानगी आहे. सभागृह अथवा खुल्या मैदानांमध्ये लग्न समारंभांच्या आयोजनास अनुमती नाही. तथापि, पावसाळ्याची सुरुवात झाली असताना छोट्या घरांमध्ये लग्न समारंभांच्या आयोजनास अनेकांना अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन वातानुकूलित नसलेली सभागृहे आणि खुल्या मैदानांवर लग्न समारंभांना परवानगी दिली जाणार आहे. राज्याचे पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे संकेत दिले आहेत. येत्या मंगळवारी याबाबत राज्य शासन सुधारित अधिसूचना काढणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे जवळपास ४ महिने राज्यभरात अनेक लग्न सोहळे लांबणीवर टाकावे लागले होते. अनलॉक झाल्यानंतरही घरातच लग्ने लावावी लागत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचे तसेच केवळ ५० लोकांच्या उपस्थितीचे नियम लागूच राहणार आहेत. यामुळे सभागृह आणि मैदानांच्या मालकांना आर्थिक दिलासा मिळू शकेल, असे वडेट्टीवार म्हणाले. येत्या मंगळवारी राज्य सरकारकडून याबाबत सुधारित अधिसूचना काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या