ब्रह्मांड संगीत कट्टाने केली कोरोनाग्रस्त सद्स्यास ५० हजाराची मदत
ठाणे
आपल्या ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून प्रत्येक ठीकाणी दररोज नवीन रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णसंख्या वाढत चालली असून रुग्णालयात कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण, होणा-या खर्चामुळे धास्तावले आहेत. ठाणे ब्रह्मांड येथिल ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्टा या संगीत संस्थेमधे माणुसकीचे व आपुलकीचे सूर उमटले. ह्या संस्थेचाच एक गायक, मंगेश भोईर हे कोरोना पॉजिटीव्ह झाले. ठाण्याच्या मानपाडा येथिल टायटन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांची आर्थिक परीस्थिती बेताचीच आहे आणि नुकतेच मागील आठवड्यात त्याचे आई-वडील एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने ५ दिवसांच्या फरकाने देवाघरी गेले. घरी दोन मुले, मात्र पगार बंद अशा अवस्थेत त्यांना तातडीच्या आर्थिक मदतीची गरज होती.
अशा कठीण परीस्थितीत ब्रह्मांड संगीत कट्ट्याने त्यांच्या साठी मदतीचा हात पुढे केला व त्याला इतर सदस्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि दोन दिवसात जवळ जवळ रु.५० हजार पेक्षा जास्त रक्कम जमा करुन मंगेश भोईर यांच्या अकाऊंटवर जमा केली आहे. अशाप्रकारे या संस्थेने दाखवून दिले की ही संस्था फक्त गाण्यासाठी नसून सामाजिक बांधिलकी जपणारी आहे. अशा प्रकारची मदत करुन ब्रह्मांड संगीत कट्ट्याने मंगेश भोईर यांस माणुसकीच्या रुपात एक सांगीतिक भेटच दिली आहे. सर्वच थरातून ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे त्यामुळे कौतुक होत आहे.
ह्यावेळी ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे अध्यक्ष अरुण दळवी यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याच्या प्रति आभार प्रकट करताना सांगितले की आम्ही आमच्या सहका-यांच्या कमिटीच्या साथीने संस्थेचे संस्थापक राजेश जाधव व ब्रह्मांड कट्टा या सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या विचारांचा वारसा घेऊन जनतेची अशीच सेवा करण्याचं व्रत हाती घेतलं आहे आणि ते नेटानेपुढे नेण्याचा निर्धार आहे.
0 टिप्पण्या