निसर्ग चक्रीवादळाने अलिबागमधील उमटे गावातील जनजीवन विस्कळीत
गावकऱ्यांना तत्काळ योग्य ती मदत करावी व जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी उपाययोजना करावी - ग्रामस्थांची विनंती
अलिबाग
अलिबाग किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग मधील उमटे गाव नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले आहे, ३ मे २०२० रोजी झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा इतका जोरदार होता की त्यामुळे बहुतांश लाईट खांब, मोठमोठी झाडे व असंख्य घरांची पडझड होऊन भिंती, छप्पर, कौल, माळे, पोटमाळे यांची अपरिमित मोडतोड होऊन मोठया प्रमाणात वित्तहानी झाली आहे, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून चक्रीवादळामुळे आहत झालेल्या गावकऱ्यांना तत्काळ योग्य ती मदत करावी व जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी उपाययोजना करावी अशी सर्व उमटे ग्रामस्थांनी विनंती केली आहे.
मुख्यमंत्रीच्या निर्देशानुसार प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले असून तलाठी पंचनामे करीत आहेत. त्याचा अहवाल तयार झाल्यानंतर नुकसानग्रस्त ग्रामस्थांना शासकीय नियमाप्रमाणे योग्य ती मदत मिळेल, तरी ग्रामस्थांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे तसेच वीज, पाणी सारख्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनातर्फे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे अलिबाग तहसीलदार यांनी कळवले आहे.
सध्या गावात लाईट नसल्याने गावाचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे, गावातून नोकरी- धंद्यांसाठी मुंबईला स्थलांतरित झालेल्या चाकरमान्यांची घरे ही मोडकळीस आल्याने त्यांच्या दुरुस्तीकरता मुंबईतील चाकरमानी गावी जाऊ इच्छित आहेत परंतु कोरोना व्हायरस कोव्हिड-१९ मुळे त्यांची ही कोंडी झाली आहे, तरी सरपंच, ग्रामस्थ मंडळ पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ व युवा एकमेकांना मदत करीत एकोप्याने निसर्गाच्या प्रकोपाशी झुंजत आहेत. सदर चक्रीवादळात विजेचा खांब अंगावर पडल्याने उमटे गावातील बंगलेवाडी परिसरातील दशरथ वाघमारे (वय ५८) यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त ही समोर आले आहे.
0 टिप्पण्या