२८ जूनपासून सलून सुरू करण्यास परवानगी
मुंबई :
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून बंद ठेवण्यात आली होती. तेव्हापासून सलूनचालक दुकानं उघडण्यास परवानगी देण्याची विनंती करत होते. अखेर येत्या २८ जूनपासून राज्यातले सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी सरकारने काही नियम व अटी सांगितल्या आहेत. यात केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनीही मास्क वापरणे बंधनकारक आहे. महत्वाचं म्हणजे केस कापण्यास परवानगी देण्यात आली आहे. दाढी करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान, ब्युटी पार्लर, स्पा आणि जीम यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नसल्याची माहिती, परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. सलूनमधून मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने अद्यापपर्यंत सलून उघडण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद असल्यामुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. सरकारने सलून पुन्हा सुरु करायला परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजाने केली होती. यानंतर आता राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
0 टिप्पण्या