Top Post Ad

 एक हाथ मदतीचा... जनहिताचा... 

 एक हाथ मदतीचा... जनहिताचा... 


जागतिक महामारीने छोट्या-मोठ्या व्यवसायांना पार देशोधडीला लावले आहे. त्यातच वर्तमानपत्राच्या व्यवसायावर देखील याचे महाभयंकर परिणाम दिसून येत आहेत. महाराष्ट्र टाईम्स या ख्यातनाम मराठी वर्तमानपत्राने आपल्या चार जिल्हा आवृत्या बंद केल्या तसेच सकाळ वर्तमानपत्र समूहातील 'सकाळ टाइम्स' व 'गोमंतक टाइम्स' हे दोन इंग्रजी पेपर बंद केले. इतकेच नव्हे तर लोकमतने अनेक कामगारांना नारळ दिला... खरं तर काळाच्या ओघात नवनवीन आवृत्त्या निघायला हव्यात, परंतु प्रिंट मीडियाला या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. आधीच कसा बसा सुरु असलेल्या या व्यवसायावर कोरोना महामारीमुळे प्रचंड संकट उभे राहिले आहे. स्वातंत्र्योत्तर पुर्व काळात सुरु झालेली हा वर्तमानपत्राचा व्यवसाय अनेक संकटांशी सामना करीत आजही तग धरून आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्तमानपत्राचा व्यवसाय आज फार मोठ्या वादळात सापडला आहे. बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्र.के.अत्रे बा.गं.टिळक अशा मान्यवरांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून फार मोठी समाजजागृती केली. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा असेल, अगर जातिभेद, वंशभेद, मानवी मुक्तीचा लढा असेल या वर्तमानपत्रांनी प्रभावीपणे यशस्वी केला. अन्यायाचा प्रतिकार केला. समाजाला सजग, विचारी बनवले. लोक शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत प्रभावी भूमिका बजावली. वर्तमानपत्र म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ, मात्र आज त्याला फार कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे.  
वर्तमानपत्र म्हणजे केवळ बातम्या नाहीत, तर मनोरंजना बरोबर देशातील मानवी विचाराला गती देण्याचे काम ती करत असतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जनसामान्यांपर्यंत पोहोचता यावे, म्हणून वर्तमानपत्रातील अनेकांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. स्वातंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य लढ्यामध्ये अंगार फुलवण्याचे काम वर्तमानपत्रांनी केले. रात्र-रात्र जागून डॉ.बाबासाहेबांनी विविध लेखांच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न मांडलेले आहेत. बहिष्कृत भारत, मूकनायक, समता या वर्तमानपत्रांनी खूप मोठी जागृती केली. ती जागृती तो अंगार आता हळू हळू विझायला लागला आहे. जागतिक महामारीमुळे अनेकांनी घरी येणारे पेपर बंद केलेले आहेत. मोबाईलवर जरी वर्तमानपत्रे दिसत असली. तरी प्रत्यक्ष हातामध्ये घेऊन पेपर वाचण्यात मजा वेगळीच असते. गेल्या काही वर्षात वेळ नसल्यामुळे पेपर वाचत नाही, विनाकारण खर्च कशाला? असाही प्रश्न काही लोक उपस्थित करतात. मात्र आपण जो पेपर घेतो त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसारही चालतात याचेही आपण भान ठेवले पाहिजे. बातमीदारांपासून ते पेपर टाकणाऱया अनेकांचे श्रम या पाठीमागे उभे असतात. रात्रीच्या वेळेला आपण सर्वजण  शांत झोपलेलो असतो. त्यावेळेला सकाळी चहाबरोबर पेपर वाचायला मिळावा, म्हणून हा वर्ग रात्रभर जागा असतो. रोजच्या रोज नवीन पेपर आपल्याला वाचायला उपलब्ध करून देणे ही एक सत्वपरीक्षा असते, वर्तमानपत्रातील प्रत्येकाला ती रोज द्यावी लागते. रस्त्यावरून जाताना एखादा मित्र आपल्याला भेटला, की आपली पावले चहाच्या दिशेने वळतात. एक कप चहाची किंमत दहा रुपये असते. परंतु केवळ अर्धा कप चहाच्या किमतीत आपणाला देशातल्या, विदेशातल्या सगळ्या घडामोडी वाचायला मिळतात, आपण विचारशील बनतो. याचेही भान आपण ठेवले पाहिजे. आपल्या समस्या मांडणाऱया, आपल्या सुख दुःखात सहभागी होणाऱया वर्तमानपत्राला, आज प्रत्येकाच्या सहकार्याची गरज आहे. समाजाचें एक अविभाज्य अंग संकटात आहे. अशा वेळेला मदतीचा हात देणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. एखादी आवृत्ती बंद झाली, की त्यावर उपजीविका असणारे अनेक जण बेरोजगार होतात, त्यांच्यापुढे उपजिविकेचे संकट निर्माण होते.  
मुळात वर्तमानपत्रात काम करणारे सर्वजण स्वाभिमानी असतात. आपल्या समस्या ते आपल्या पुढे कधीच मांडणार नाहीत, कितीही संकटे आली तर मूकपणे सहन करतील, एवढ्या अडचणी असतानाही कोणत्याही वर्तमानपत्राने स्वतच्या अडचणी वर एखादा लेख लिहिलेला आपल्याला दिसत नाही. आपलं जीवन केवळ दुसऱयाच्या समस्या मांडण्यासाठी, आनंदात सहभागी होण्यासाठी. स्वतचे अश्रु लपवुन ,आपल्या आनंदात सहभागी होणारा, हा वर्ग व त्याच्या अडचणी आपणाला जाणून घ्याव्या लागणार आहेत. यासाठी फारसं काही न करता प्रत्येकाने, म्हणजे कमावणाऱया प्रत्येक व्यक्तीने आपल्याला आवडेल, असे एक वर्तमानपत्र दररोज खरेदी करावे. एखादे साप्ताहिक, मासिक घ्यावे. मित्रांनो चार रुपयाचा पेपर घेतला, तर पाच रुपये दिल्यावर एक रुपया आपल्याला लगेच परत दिला जातो. सुट्टे पैसे नाहीत, हा शब्द कधीही स्टॉलवर आपल्याला ऐकायला मिळत नाही. हा सगळा कष्टकऱयांचा वर्ग स्वाभिमानाने जगतो आहे. वर्तमानपत्र टाकायला येणाऱया मुलाचा हसरा चेहरा सकाळी आपल्याला दिसतो आणि आपला दिवस प्रसन्न जातो. पाच रुपयाचे वर्तमानपत्र विकत घेऊन, हजारो स्वाभिमानी व्यक्तींना. संस्थांना आपण बळ द्यावे. आजच्या या संकटाच्या काळात आपल्याला `प्रिंट मीडिया'च्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे गरजेचे आहे. तरच वर्तमानपत्र वाचकांची चळवळ गतिमान होईल. प्रत्येकाने आपल्याला आवडेल असे एक तरी वर्तमानपत्र खरेदी करणे, हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे. या देशातील लाखो वाचक प्रिंट मीडियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रा]िहले तर आणि तरच एकही वर्तमानपत्र बंद पडणार नाही. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून आपण आपले सर्व व्यवहार हळू हळू सुरू करत आहोत. तेव्हा प्रत्येकाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या घरी दररोज एक वर्तमानपत्र सुरू करावे. पुर्वी सुरु असलेले वर्तमानपत्र पुन्हा सुरु करण्यास विक्रेत्याला सांगावे. तर आपण लाखो लोकांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्यापासून वाचवू शकू.... 


 



 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com