निकृष्ट जेवणामुळे कोविड डॉक्टरांचीच तब्येत बिघडली
महापालिकेच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी
पनवेल
पनवेल उपजिल्हा कोविड-19 रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि रूग्णांना पुरविण्यात येणारे जेवण अतिशय सुमार दर्जाचे असल्याने तेथील डॉक्टरांना डिसेंट्रीचा त्रास झाला आहे. याला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर त्वरीत कारवाई करून त्याच्याकडील ठेका रद्द करावा, अशी महत्वपूर्ण मागणी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. महापालिकेने अधिगृहित केलेल्या कोविड उपजिल्हा रूग्णालयात अनेक समस्यांचा सामना करत तेथील डॉक्टर आणि इतर कर्मचारी कोविड रूग्णांवर उपचार करीत आहेत. गेल्या आठवड़्यात सार्वजनिक आरोग्य खात्याच्या उपसंचालिका गौरी राठोड यांनी रूग्णालयास भेट दिली असता डॉक्टरांच्या जेवणाचा प्रश्न पुन्हा समोर आल्याने त्यांनी याबाबत आयुक्तांना कळवून देखील या प्रकरणी महापालिकेने लक्ष दिले नाही.
अखेर त्याच्याविरूद्ध तात्काळ कारवाई करून सकस, पोषक आहार न पुरवला गेल्यास महापालिकेविरूद्ध आंदोलन छेडण्याचा तसेच न्यायालयात याचिका दाखल करण्याचा लेखी इशारा पनवेल संघर्ष समितीने दिला आहे. कोविड रूग्णालयातील एक्स-रे यंत्रणा बिघडली तर कोविड रूग्णांची एक्स रे द्वारे तपासणी करण्यास अडचण होऊ शकते, त्यामुळे तिथे वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यात यावी. तसेच कोविड सेवेतील डॉक्टरांना विश्रांती मिळावी, म्हणून तिथे नव्या डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात यावी, अशा महत्वाच्या मागण्यांचे निवेदन आज दि २० जुन रोजी देशमुख यांना पाठविण्यात आले आहे.
0 टिप्पण्या