Top Post Ad

मदतीकरिता नेहमीच तत्पर  गुरुद्वारा श्री दशमेश दरबार- ठाणे

मदतीकरिता नेहमीच तत्पर  गुरुद्वारा श्री दशमेश दरबार - ठाणे


- सुबोध शाक्यरत्न - 

23 मार्च अचानक देशाचे प्रधानमंत्री येतात आणि देशवासियांना सांगतात देश लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्या आधी मात्र महाराष्ट्र सरकारने संचारबंदी सुरु केली होती. परंतु कोणतेही नियोजन नाही. कसली चर्चा नाही. अचानक देशवासियांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. आणि त्यानंतर देशवासियांचे जे हाल झाले ते सांगण्यासारखे नाहीत. बाहेर पडलो तर मोठ्या आजाराची भीती असल्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत देशातील नागरीकांनी घरीच राहणे पसंत केले. मात्र रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि कामगार यांची तर वाताहतच झाली. या सर्व काळात रोजंदारीवर काम करणारे मजूर, कंत्राटी कामगार आणि आदिवासी बांधवांचे जगणे असह्य झाले आहे. रोजच्या कमाईवर ज्यांचे जीवन अवलंबून होते. त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले. दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. घरात काही नाही, पण घराबाहेर पडू शकत नाही अशा अवस्थेत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. अशा विवंचनेत, कंत्राटी कामगार, मजूर, आणि खेड्यापाड्यात असलेला आदिवासी सापडला. असा परिस्थितीतही देवदुताप्रमाणे काम करणाऱया अनेक संस्था संघटना यांच्यासाठी धावून आल्या. यामध्ये सर्वात अग्रस्थानी असलेले ठाण्यातील तीन हात नाका येथील शीख बांधवांचे गुरुद्वार श्री दसमेश दरबार.  
शिख बांधवांचे दान कार्य सर्वांनाच ठाऊक आहे.


गुरुद्वारामध्ये गेलेली व्यक्ती कधीही उपाशी राहिलेली नाही. संपूर्ण भारतात लॉकडाऊनच्या काळात गुरुद्वारांनी करोडो लोकांना जगवले. त्यांच्यात जगण्याची नवी उमेद दिली. ठाण्यातील या गुरुद्वारामधून लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सकाळी 7 हजार तर सध्याकाळी 5 हजार लोकांचे जेवण बनत होते. रस्त्यावर आपला संसार मांडणाऱया लोकांसाठीच नव्हे तर घरामध्ये राहणाऱया मोलमजुरी करणाऱयांसाठीही जेवणाची सोय करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर हजारो कुटुंबाना तांदूळ, गव्हाचे पीठ, गोडेतेल, साखर, मीठ, मिरची अशा जीवनावश्यक वस्तू वाटप केले. केवळ गुरुद्वाराजवळ येणाऱया लोकांकरिताच नाही तर अगदी त्यांच्या घरी जाणून ही मदत पोहोचवली. कोरोना प्रादुर्भावाचा आलेख वर चढत असतानाही मदतीच्या कार्यात खंड न पडता सर्वांना दोन वेळचा चहा, दोन वेळचे जेवण, इतकेच नाही तर सोबत फळंही. त्यामुळे गुरुद्वारासमोर प्रचंड मोठी रांग लागते. शिवाय कोरोनाच्या नियमांना अनुसरून सोशल डिस्टन्सचे पालन करून लोक उभे रहात आहेत. प्रत्येकाच्या चेहऱयावरील हास्य सांगत असते की तो पोटभरून जेवला.  


ठाण्यातील या गुरुद्वाराच्या मदतीवर हजारो कुटुंब निर्भर होती. आणि त्यांच्यासाठी गुरुद्वारा नेहमीच तत्पर होता आणि आहे. इथे येणारा मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो त्याला पोटभरून जेवण मिळतेच. कोरोना कालावधीत तर हे कार्य अधिक जोमाने सुरु झाले. आता मजुरवर्ग आपआपल्या गावी गेल्यानंतर मात्र थोडी उसंत मिळाली. तरीही आजच्या घडीला सुमारे तीन हजार लोकांकरिता जेवणाची तयारी होतच आहे. सकाळ संध्याकाळ हे कार्य तितक्याच जोमाने सुरु आहे जेवढे लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात होते. गुरुद्वारा संस्थेचे प्रमुख आणि ठामपाचे विद्यमान नगरसेवक गुरुमुखसिंग बिशनसिंग स्यान हे या सर्वांवर जातीने लक्ष ठेवून आहेत.  लॉकडाऊनच्या या कालावधीत त्यांनी आपला संपुर्ण वेळ गुरुद्वाराच्या मदत कार्यासाठी वाहून दिलाय. त्यांच्यासोबत सुमारे 40जन या कार्यासाठी अहोरात्र झटत होते. आता हळू हळू परिस्थिती काहीशी पूर्वपदावर येत असल्याने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आज 25 जन अद्यापही कार्य करीत आहेत.  
पुढे पावसाचे दिवस आहेत आणि लॉकडाऊन वाढलाच तर काय करायचे? असा प्रश्न अद्यापही कामगार, मोलमजुरी करणाऱयांसमोर आहे. संकट हे केवळ कमकुवत घटकांसाठीच असते. कोरोणाच्या दिवसातही तेच झाले. जे रोजंदारीवर काम करतात त्यांच्यासाठी हे संकट म्हणजे कहरच होता. यावर मात करीत या गोरगरीब कष्टकऱयांना गुरुद्वाराने आधार दिला आणि आजही देत आहेत. या कार्याची दखल ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी नेहमीच घेतली असल्याचे दिसते. वेळात वेळ काढून ते या ठिकाणी येत असतात  आणि या ठिकाणी सुरु असलेल्या मदत कार्याची आस्थेने चौकशी करून येथील शीख बांधवांना धन्यवाद देतात अशी माहिती संस्थेचे सदस्य मनजितसिंग अरोरा यांनी दिली.  


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com