Trending

6/recent/ticker-posts

शासनाने किमान काही महिने तरी क्रिडा संस्थांना अनुदान देण्याची मागणी

शासनाने किमान काही महिने तरी क्रिडा संस्थांना अनुदान देण्याची मागणी


क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका...


तातडीने उपाययोजना करण्याची क्रीडा संघटकांची मागणी


ठाणे 


 कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी सुटीमध्ये मुलांसाठी आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेतली जातात, अनेक स्पर्धांचेही आयोजन केले जाते. या साऱ्या स्पर्धा आणि शिबिरे रद्द करावी लागली आहेत बॅडमिंटन,  बॉक्सिंग, स्केटिंग, बास्केटबॉल, खोखो, कबड्डी, क्रिकेट, जिम्नॅस्टिक्स, टेबलटेनिस,   बिलियर्डस,  अॅथलेटिक्स, तलवारबाजी अशा  विविध खेळांच्या  शिबिरांचे आयोजन एप्रिल व  मे या महिन्यांत राज्यभरात विविध संस्थांमार्फत होते.  खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांना तयार करणाऱ्या प्रशिक्षकांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पारिश्रमिक देणे संस्था/संघटनांना कठीण झाले आहे. त्यांना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता येतील इतके मानधन देण्याच्या दृष्टीकोनातून शासनाने, किमान काही महिने तरी या संस्थांना अनुदान द्यावे, अशी मागणी क्रीडा संघटक आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.   


कोरोनाच्या महासाथीमुळे इतर सर्वच क्षेत्रांसह, क्रीडाक्षेत्रालाही त्याचा मोठा फटका बसल्याचे जाणवत आहे. क्रीडाक्षेत्राचा संबध उत्तम आरोग्याशी असला तरी या  अद्यापही लस न सापडलेल्या महाआजारामुळे, क्रीडाक्षेत्रालाही गंभीर `आजार` होण्याची शक्यता आहे. आरोग्यासाठी क्रीडेचे महत्व मोठे असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास  भावी क्रीडापटूंवर तसेच एकूणच पुढच्या पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.  कामगिरीचा आलेख उंचावत ठेवायचा असेल तर सराव अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्या मैदानावरील सर्व गोष्टी बंद असल्याचा फटका खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे. १४, १७, १९ वयोगटातील  खेळाडूंना याचा सर्वाधिक फटका सोसावा लागतो आहे. भविष्यात कधी क्रीडा स्पर्धा होतील हे आत्ताच सांगता येत नसले तरी जेव्हा त्या होतील तेव्हा सराव नसल्याने कामगिरी खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


       अशाही परिस्थितीतही काही क्रीडा संस्था/संघटनांनी इतर पद्धतींनी काम सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. उन्हाळी शिबिरे घेऊ शकत नसले तरी त्यांनी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत खेळांची सखोल माहिती देण्यात येते.  ठाण्यातील पिनॅकल अकादमी ही अग्रगण्य संस्था लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या खेळाडूंसाठी टेबल टेनीसच्या ऑनलाईन कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन करत आहे.  या कार्यशाळेत खेळाडूंसाठी  नामांकित खेळाडूंच्या विविध स्पर्धा दाखवून त्यांचे विश्लेषण करणे इत्यादी बाबींचा समावेशआहे. या ऑनलाईन कार्यशाळेत खेळाडूंसह त्यांचे पालकही सहभागी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या ऑनलाईन कार्यशाळेचा खेळाडूंना आगामी स्पर्धांमध्ये निश्चित लाभ होईल असे  पिनॅकलचे समीर सारळकर, नम्रता सारळकर व प्रदीप मोकाशी यांनी सांगितले.


क्रीडा संस्थांनी असे काही उपाय शोधले असले तरी  त्यांना दोन मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पहिले म्हणजे संस्था असलेल्या जागेचे दरमहा भाडे. या बाबतीत शासनाने काही उपाय योजून  क्रीडा संस्था/संघटनांवरील भार कमी केला तर भारताच्या खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले ते मोठे पाउल ठरेल. दुसरे संकट आहे ते या उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांना तयार करणाऱ्या प्रशिक्षकांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पारिश्रमिक देणे संस्था/संघटनांना कठीण झाले आहे. त्यांना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता येतील इतके मानधन देण्याच्या दृष्टीकोनातून शासनाने, किमान काही महिने तरी या संस्थांना अनुदान द्यावे, अशी मागणी क्रीडा संघटक आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.   


 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या