Trending

6/recent/ticker-posts

रासायनिक खतांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथक

रासायनिक खतांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथक


जिल्हा परिषद कृषी  विभागाकडून खते, बियाणांचे नियोजन


१०  हजार ९७३ क्विंटल बियाणे व ४ हजार ४७४ मेट्रिक टन खत जिल्ह्यात उपलब्ध


 जिल्ह्यात शेतीसाठी मुबलक बियाणे आणि खते उपलब्ध -  मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणेठाणे 


रासायनिक खतांचा व बियांणाचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाकडून तालुका आणि जिल्हा स्तरावर सहा भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. जर शेतकऱ्यांना खतांमध्ये किंवा बियाणामध्ये काळाबाजार दिसून आला किंवा कोणत्याही प्रकारे संशय वाटत असल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पंचायत समिती कार्यालयात तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावर गुणनियंत्रण निरीक्षक कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्याचे कार्य करत आहे.


ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या शेतीकामाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद कृषी  विभागाकडून खते, बियाणे, व किटकनाशकांचे नियोजन करण्यात आले आहे.  यंदाच्या हंगामात जिल्ह्यासाठी भात बियाणांची गरज १० हजार ६७०  क्विंटल एवढी असून आज रोजी १०  हजार ९७३ क्विंटल बियाणे उपल्बध झाले आहे. तर युरिया खताची आवश्कता ४ हजार ४४१ मेट्रिक टन असून आज अखेर ४ हजार ४७४ मेट्रिक टन इतके खत जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतीसाठी मुबलक बियाणे व खते उपलब्ध आहेत असे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सांगितले.


ठाणे जिल्ह्यात भात पिकाखालील क्षेत्र हे ५९ हजार २७९ हेक्टर आहे. तर नाचणी पिकाखालील ३ हजार ३७८ हेक्टर क्षेत्र आहे. त्याचबरोबर वरी पिकाखालील ९१६.१२ हेक्टर क्षेत्र  असून भाजीपाला व कडधान्य पिकसहित खरीप हंगामाखालील एकूण क्षेत्र हे ६७ हजार ४४३ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. जिल्ह्यातील शेतकरी जास्त प्रमाणात भात पिकाची लागवड करत असून यंदा भात पिकासाठी आवश्यक असणारे बियाणे आणि खते मागणीपेक्षा अधिक उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार खते, बियाणे उपलब्ध होणार आहेत. तसेच मुबलक प्रमाणात कीटकनाशक व बुरशीनाशकाचा साठा उपलब्ध आहे.


शेतकऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण खते, बियाणे, व किटकनाशके मिळावीत या करिता त्यांचे नमुने काढण्याचे काम चालू आहे. आज अखेर भात बियाणाचे १६५ नमुने काढून पुणे येथील बीज तपासणी प्रयोगशाळेत  तपासणी करिता पाठविण्यात आलेलें आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे व खतांचा साठा करू नये त्यांना पुरेसा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून देण्यात येतील असे जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी सांगितले.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या