सरकारच्या बहुसंख्य विभागांची कामे क्रिस्टल कंपनीकडेच
मुंबई
भारतीय जनता पार्टी- शिवसेना या २०१४-२०१९ या काळातील युती सरकारमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीने सरकारच्या बहुसंख्य विभागांच्या विविध कामाच्या निविदा जिंकून (?) सर्वाधिक कामे मिळवली. क्रिस्टल कंपनी प्रामुख्याने सुरक्षा रक्षक पुरवणे, स्वच्छता/ साफ सफाईचे कामे या क्षेत्रात कार्यरत आहे. मंत्रालयात साफसफाईचे काम करणारी भारत विकास ग्रुप (बिव्हीजी) या कंपनीकडील बहुतेक कामे आमदार लाड यांच्या क्रिस्टल कंपनीने मिळवली. अशाच प्रकारे समाजकल्याण विभागाच्या मुला - मुलींच्या वसतिगृहाला सुरक्षा रक्षक पुरविण्याचे बीव्हीजी कंपनीकडे असलेले निम्म्याहून जास्त काम क्रिस्टलने मिळवले.
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा ली या कंपनीचे कर्मचारी असलेल्या लातूर जिल्ह्यातील सुमारे ६१ सुरक्षा रक्षकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जानेवारीपासून पगार नसल्याने कुटुंबाची परवड होत असून उपासमारीची वेळ आल्याची तक्रार या सुरक्षा रक्षकांनी केली आहे.
लातुरात समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत १० वसतीगृह येतात. त्यात क्रिस्टल कंपनीचे ६७ सुरक्षा रक्षक काम करतात. त्यापैकी आनंद कांबळे यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यापासून त्यांना कंपनीने पगार दिलेला नाही. कांबळे हे वसतिगृहाच्या युनिट ४ येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात. “पगार मिळत नसल्याने कुटुंबाचे पालनपोषण करणे अवघड झाले आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. क्रिस्टल कंपनीच्या सायन, मुंबई येथील कार्यालयात तक्रार केली. पण कंपनीचे व्यवस्थापक उत्तर देत नाहीत. अखेर आम्ही लातूर जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे तक्रार केली," असे आनंद कांबळे यांनी सांगितले.
कांबळे पुढे म्हणाले की त्यांना महिन्याला रु ७५०० रुपये पगार (Salary) मिळतो तर रु १५०० हे प्रॉव्हिडन्ट फंड म्हणून कंपनी कपात करून घेते. “इतक्या कमी पगारात घर कसे चालवावे हा नेहमीच प्रश्न असतो. तशात पाच महिने पगार नाही. कंपनी ऐकत नाही, सरकार ऐकत नाही. आम्ही काय करावे?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अन्य सुरक्षा रक्षक शामराव झुंजे म्हणाले, "मी गेल्या अनेक वर्षांपासून क्रिस्टल कंपनीत काम करत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कुठलेही काम नाही, पगार नसल्याने दोन वेळच्या जेवणाची सोय कशी करावी, हा प्रश्न पडला आहे. कंपनीने पगाराची सोय करावी." यासंदर्भात प्रसाद लाड यांनी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत आणि त्यांना पगार देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मान्य केले.
सरकारकडे माझे रु १४२ कोटी रुपये घेणे आहे. यातील काही बिले मागच्या वर्षी जून महिन्यापासून थकल्याने कर्मचाऱ्यांचे पगार करणे अवघड झाले आहे. सरकारकडून निधी मिळाला नाही तरी मला tax तर भरावा लागतो, समाजकल्याण विभागाने माझे बिल थकवल्याने लातूर येथील सुरक्षा रक्षकांचे पगार थकले आहेत. परंतु, या महिनाअखेर त्यातून मार्ग निघेल आणि पगार देता येईल, असे लाड म्हणाले.
0 टिप्पण्या