जोशी-बेडेकर महाविद्यालयात कोरोना रुग्णांसाठी ५०० खाटांचे काम पुर्ण
ठाणे :
कोविड रुग्णालयासाठी ठाणे महापालिकेने विद्या प्रसारक मंडळाच्या १३ एकराचा संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आता रुग्णांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी कोविड रुग्णालये उभारत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रभाग समितीनिहाय शाळा, महाविद्यालये किंवा सभागृह क्वारंटाइन सेंटरसाठी ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यानुसार विद्याप्रसारक मंडळाला जोशी-बेडेकर महाविद्यालय कोविड रुग्णांसाठी ताब्यात घेणार असल्याचे आधी महापालिकेने पत्राद्वारे कळवले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाचा ताबा घेतला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता महाराष्ट्र सरकारने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, मार्च २०२० पासून लागू केला. १४ मार्च २०२० ला महाराष्ट्र कोविड २०१९, उपाय योजना २०२० नियमही लागू केले. या नियमातील तरतुदीनुसार, सरकारला सक्षम अधिकारी घोषित करून त्यांना कोणत्याही संस्थेच्या, कोणत्याही मालमत्ता व व्यक्तीची / कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहीत करण्याचे अधिकार देण्यात आले. या अधिकाराचा वापर करूनच ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाचा परिसर अधिग्रहित करण्यात आला. महापालिकेने कायद्यानुसार महाविद्यालय क्वारंटाइन सेंटर म्हणून ताब्यात घेतले आहे आणि तसे महाविद्यालयाला कळविले आहे, अशी माहिती पालिकेने दिली. गोरगरीबांकरिता निर्माण केलेल्या बीएसयुपीच्या अनेक इमारती क्वारंटाईन सेंटरसाठी पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. तसेच महापालिकेच्या अनेक शाळाही क्वारंटाईन सेंटर करण्यात आल्या आहेत. तरीही ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिकेने ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या चेंदणी कोळीवाडा येथील खाडीकिनारी असलेल्या जागेमध्ये ५०० खाटांच्या कोविद केद्राचे काम पूरे केले आहे.
0 टिप्पण्या