वाढीव वीजबिल विरोधात ठाणेकरांची महावितरणच्या कार्यालयावर धडक

वाढीव वीजबिल विरोधात ठाणेकरांची महावितरणच्या कार्यालयावर धडक


प्रत्येक ग्राहकाची तक्रार सोडविणार - महावितरण अधिकारी
ठाणे


हिरानंदानी इस्टेट, ब्रह्रांड, पातलीपाडा, डोंगरीपाडा आणि कोलशेत परिसरातील ग्राहकांना आकारण्यात आलेल्या अन्यायकारक व जादा वीज बिलांविरोधात रहिवाशांनी कार्यालयावर धडक दिली. वीजबिले भरणा करण्यासाठी तीन हप्ते देण्याबरोबरच प्रत्येक ग्राहकाच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल. कोणत्याही ग्राहकाने महावितरणशी ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधावा, असे आश्वासन यावेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
महावितरण कंपनीकडून दर चार वर्षांनी होणारी दरवाढ यंदा एप्रिलमध्ये करण्यात आली. त्यात लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेतली गेली नाही. त्यामुळे कमीतकमी एक हजार रुपये बिले येणाऱ्या ग्राहकांनाही अवाच्या सवा ५ ते २५ हजारांपर्यंत बिले आली आहेत. त्यातून नागरिकांमध्ये संताप होता. या पार्श्वभूमी,,वर भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आज महावितरण कंपनीच्या पातलीपाडा येथील कार्यकारी अभियंत्याची भेट घेतली. त्यावेळी प्रत्येक ग्राहकाला सहकार्य करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले. प्रत्येक ग्राहकाच्या बिलातील स्लॅबवाईझ फरक स्पष्ट करण्यात येईल. तूर्त ३ हप्त्यांमध्ये बिल भरण्यास परवानगी आहे. मात्र, सहा हप्ते देण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधू, असे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.
वाढीव टेरिफ दर डिसेंबर महिन्यापर्यंत त्वरित स्थगित करावेत. तसेच सुधारित वीज बिले ग्राहकांना पाठवावीत, इन्स्टॉलमेंट योजनेमध्ये व्याज आकारू नये, इंस्टॉलमेंट योजनेचा कालावधी किमान सहा महिन्यांचा असावा, सध्या आकारलेल्या बिलांना स्थगिती देऊन सरसकट सर्व बिले ५० टक्क्याने कमी करावीत आदी मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्याबाबत विचार करण्याचे आश्वासन महावितरणने दिले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad