Trending

6/recent/ticker-posts

गाढवाचं लग्न...... दादु इंदुरीकरांना विनम्र अभिवादन


ग्लोबलायझेशन, बाजारीकरण, उदारीकरण, मॉल संस्कृती, अशा मोहजाळात आता इथला सामान्य माणूस सहजपणे अडकला आणि आपोआप गुरफटला जातोय. अशा स्थितीत कॉलेजच्या कट्ट्यावरच्या तरुण पोरांना जर जातीविषयक काही विचारलं तर त्याचं उत्तर असतं. आता कुठे काही जातीपातीचं राहिलंय. आता आम्ही बघा सर्वजण मिळून मिसळून राहतो. पुर्वीसारखं आता काहीही राहिलं नाही. आता सर्व समान सर्व सारखेच झालेत. उगीच काही लोकांच्या डोक्यात त्या जातीपातीबद्दल नको त्या जुन्या समजुती आहेत. तरुणांच्या तोंडून असं काही ऐकलं की कधी कधी खरंही वाटतं. आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही. आता आपण एकाच हॉटेलमध्ये बसून चहा पितो. सर्वजण एकाच मार्गिकेमधून चालतो. एकाच रेल्वेमधून प्रवास करतो वगैरे वगैरे. मग खरंच जातीपातीचं काही राहिलेलं नाही असं वाटायला लागतं.  
पण जेव्हा वर्षभरापूर्वी अश्वघोष आर्ट्स अॅन्ड कल्चरल फोरमचे जयराम जाधव माझ्याकडे आले आणि मला दादू इंदुरीकरांबाबत सांगितले तेव्हा मात्र कॉलेजच्या त्या कट्ट्यावर अजूनही किती अज्ञान आहे हे समजलं. इथल्या जातीव्यवस्थेबद्दल सध्या निरनिराळ्या `एनजीओ' सारख्या सामाजिक संस्थांकडून आणि तत्सम संघटनांकडून  जाणिवपूर्वक `पॉझिटीव्ह' विचारसरणी पसरवून ठेवली आहे. जेणेकरून छुप्या जातीव्यवस्थेबद्दल इथला तरुण अनभिज्ञ राहून त्या विरोधात लढा उभारणार नाही. 
दादू इंदुरीकर ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला कलेच्या माध्यमातून आपली ओळख करून दिली. आणि नुसतीच ओळख नाही तर राष्ट्रपती पदक खिशात घालून हे दाखवून दिलं की कलेच्या क्षेत्रात आम्हीच वरचढ आहोत. त्याची मक्तेदारी कुणाचीही नाही. अशा या माणसाला इतके दिवस अंधारकोठडीत रहावं लागलं. त्याच्या नावाने काही-काही नाही. कोणत्या नाट्यमंचाला, किंवा कोणत्या नाट्य पुरस्काराला त्याच्या नावाने संबोधण्यात आलं नाही. याचं कारण एकच हा वगनाट्य सम्राट तथाकथित उच्चवर्णिय समजणाऱया समाजातील नव्हता. नाहीतर आज त्याच्या नावाने एकतरी नाट्यसंकूल उभारलं गेलं असतं. आणि इथेच आज जातीव्यवस्थेची पक्कड किती मजबूत आणि अजूनही किती खोलवर रुजली गेलीय हे दिसून येतं.  
कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा मारणाऱया या तरुण मंडळींना अजुनही याचा गंध नाही.  सर्व जगाने त्यांची विद्वत्ता स्विकारली असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला आजतागायत घटनेच्या सुत्रातून एकसंघ ठेवले मात्र त्यांचे ऋण न मानणारी आणि त्यांच्या विरोधात वेळ येताच गरळ ओकणारी इथली प्रस्थापित मंडळीची मानसिकता स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतर देखील तशीच आहे या पेक्षा या देशाचं दुर्दैव कोणतं असेल ? 
रणजी ट्रॉफिमध्ये सचिन तेंडुंलकरच्या आधी विक्रमी धावसंख्या करणारा विनोद कांबळी जेव्हा कळत-नकळत भारतीय संघातून `आपोआप' बाद होतो, तेव्हा खरं तर त्याची जातच  आडवी आलेली असते, हे मात्र जाणीवपूर्वक लपवल्या जातं. वैयक्तीक स्वार्थासाठी खेळणाऱयांना `देशासाठी खेळतात' अशी विशेषणे देऊन प्रचंड प्रसिद्धी दिली जाते. जेणेकरून याच्याशिवाय आता दुसरा खेळाडू होणे शक्यच नाही असा आभास निर्माण केला जातो. ही देखील छुपी जातीव्यवस्थाच आहे. एका आदिवासीने मुंबई शहराला पुण्याचा मार्ग दाखवला मात्र त्या आदिवासीचे नाव मुंबई-पुणे महामार्गाला देण्यासाठी संघर्ष करावा लागतो. प्रस्थापिताचं नाव द्यायला कोणाला विचारावही लागत नाही. केवळ मंगेशकर कुटुंबियांना त्रास होतो म्हणून आजही त्यांच्या घरासमोरच्या उड्डाणपूलाचा प्रोजेक्ट शासनाने बासनात गुंडाळून ठेवला. मात्र शहरी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लाखो कुटुंबांना बेघर करून त्यांना अन्नपाण्यावाचून तडफडायला लावणारी त्यांची जातच या झोपडीत राहणाऱयांच्या मागे आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे या छुप्या जातीव्यवस्थेत घडत आहेत. काहीचा उहापोह होतो तर काही काळाच्या अंधारात गडप होतात 
याच जातीव्यवस्थेचा फटका अशा अनेक कलाकारांना त्यांच्याही नकळत बसला आहे. त्याचा दोष मात्र कधी कधी परिस्थीतीवर किंवा त्या त्या समाजावर टाकून ही मंडळी मोकळी होतात. खोलवर रुजलेल्या या जातीव्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न कुणीही करताना दिसत नाही. प्रल्हाद शिंदे यांचे नाव नाट्यसंकुलाला देण्यासाठी प्रचंड उर्जा खर्ची करावी लागते. मागणी-मोर्चा आदी मार्ग पत्करावे लागतात. मात्र दिनानाथ मंगेशकर नाट्य संकुल सहजतेने निर्माण होतं ही आहे इथली छुपी जातीव्यवस्था!  
`गाढवाचं लग्न'द्वारे खरं तर दादूंनी इथल्या प्रस्थापितांना अनेक धक्के दिले. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागला. नाहीतर काही काळापूर्वी आलेल्या नाटकांमधून देव-धर्माची खिल्ली उडवल्यावरून त्या नाटकाचा बेरंग करून टाकण्याचं कुटील कारस्थान इथल्या कट्टरपंथीयांनी केलं. परंतु दादूंनी `देव सगळे रंडीबाज' असं म्हणून सगळ्या देवांना एकाच रांगेत बसवून टाकलं. पण त्यांनी केलेली संवादफेक आणि उभा केलेला एंकदर वगनाट्याचा फार्स पाहता या वगनाट्याविषयी काहीही न बोललेलं बरं म्हणून सर्वच मृग गिळुन बसले होते. मात्र दादूं गेल्यानंतर त्यांच्या या वगनाट्यालाही अंधार कोठडीत ढकलण्याचे पद्धतशीरपणे काम प्रस्थापितांनी केले. आणि त्यात त्यांना यशही आले. 
पण कोंबडं आरवलं नाही म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही या प्रमाणे दादूंच्या कलेची कदर करणारी माणसं आजही समाजात आहेत हे सिद्ध झालं. त्यांच्या नावानेच जीवनगौरव पुरस्कार देण्याची हिंमत जाधव-झेंडे यांनी सुरु केली. त्यामुळे ते गौरवास पात्र नक्कीच आहेत. अश्वघोष फोरमतर्फे सुरु करण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम खरं तर समाजाने उचलून धरायला हवा. त्यांना प्रोत्साहन देऊन हा कार्यक्रम  प्रत्येक वर्षी कसा अधिकाधिक फुलून येईल याकडे लक्ष द्यायला हवं. मात्र तसे होतांना दिसत नाही. पांढरपेशी समाजाने केलेल्या कार्याचा उदो उदो करण्याची जी खुमखुमी इथल्या गुलामांना लागली आहे त्याचा प्रत्यय इथेही दिसून येतो. `आपला तो बाळ्या.........' या उक्तीप्रमाणे याकडेही दुर्लक्षच!  


 


 साभार...... 


१३ जून :


तळेगाव स्टेशन जसराज थिएटरच्या गाढवाचं लग्न या वगनाटयातील सावळया कुंभार भूमिकेमुळे लोककलेतील हिरा ठरलेले वगसम्राट दादू इंदुरीकर मावळच्या भूमीत जन्मले याचा महाराष्ट्रासह स्थानिकांनाही विसर पडल्याचे चित्र आहे. लोककलावंतांना प्रेरणादाई ठरावा असा दादू इंदुरीकरांचा जीवनप्रवास अद्यापही दुर्लक्षितच आहे. वगसम्राट दादू इंदोरीकर म्हणजे तमाशाच्या फडावरील एक हरहुन्नरी, अष्टपैलू आणि बहुआयामी कलाकार. पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यामध्ये तळेगावचाकण रस्त्यावरील इंद्रायणी नदीकाठी इंदोरीमध्ये जन्मलेल्या दादूंचे शिक्षण अवघे सातवीपर्यंत झाले आणि कलगी-तुऱ्यातले ख्यातीप्राप्त कलाकार वडील राघोबांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेली इंदुरीकरांमधील सोंगाड्याची अभिजात कलाकारी या तमाशा कलावंतास राष्ट्रपति पारितोषिकापर्यंत घेऊन गेली.  त्याकाळी अवघ्या महाराष्ट्राने दादू इंदुरीकर यांना अक्षरश: डोक्यावर घेतले होते. १३ जून १९८० रोजी  लोकांना खळखळून हसवणाऱ्या या हुरहून्नरी कलाकाराने जगाचा निरोप घेतला. या महान कलाकाराला त्यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन


Post a Comment

0 Comments