माळशेज'च्या पर्यटनावर कोरोनाचे सावट'
ठाणे जिल्हयातील शहापूर मुरबाड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकाऱ्यांचे बंदीचे आदेश
शहापूर
सह्याद्रीच्या अतिविराट,अतिराकट अजस्र शिळांच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे फेसाळ धबधबे हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे खास वैशिष्ट्य ! याच पर्वतराजी मधील पर्यटकांना खुणावणारा माळशेज घाट म्हणजे सह्याद्रीच्या शिरपेचातला मनाचा तुराच ! दरवर्षी वर्षा सहलीचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांची पावले आपसूकच याच माळशेजकडे वळतात. महाराष्ट्रातील पर्यटनाचे 'हॉट डेस्टीनेशन' असणारा हा घाट यंदा कोरोना प्रादुर्भाच्या भीतीनं पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.यंदा पर्यटकांच्या वर्षा सहलीच्या आनंदोस्तावर कोरोनाचे भयानक असे सावट मात्र कायम आहे .
कोरोना आजाराच्या पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून यंदा पर्यटन स्थळांंवर पर्यटकांना पावसाळ्यात बंदीचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी दिले आहेत. मुरबाड तालुक्यातील माळशेजसह सिध्दिगडचे धबधबे तसेच शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध माहुली गडावरील धबधबे , अशोका धबधबा ,भातसा जलाशय परिसर मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, पाडाळे डॅम, सोनावळे लेण्या, डोंगरन्हावे, गोरखगड, नाणेघाट, धसई डॅम, आंबेटेंबे आदी पर्यटन स्थळांवर व नैसर्गिक धबधब्यावंर तसेच तलाव क्षेत्रात जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून शहापूर मुरबाड तालुक्यातील पर्यटनस्थळांवरील वर्षा सहलीवर बंदीचा हा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाला केवळ कोरोनाच्या वाढत्या आजारामुळे घ्यावा लागला आहे.दरम्यान यापूर्वी माळशेज घाट हा पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या भीतीने तर मुसळधार पर्जन्यमान झाल्यावर माहुली ,व अशोका धबधबे प्रशासनास वेळोवेळी बंद केलेले आहेत.परंतु यंदा मात्र त कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर असल्याने लोकांची सुरक्षा लक्षात घेता पावसाळ्यातील गर्दीची ही सर्वच पर्यटन स्थळ प्रशासनाला तात्काळ बंद करावी लागली आहेत असं पहिल्यांदाच घडत असल्यानं एवढा मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला आहे .
0 टिप्पण्या