सोमवारपासून ठाणे जिल्ह्यात घरपोच मद्य विक्रीला सुरुवात


सोमवारपासून ठाणे जिल्ह्यात घरपोच मद्य विक्रीला सुरुवात


ठाणे


ठाण्यातील घोडबंदर परिसर १८ तारखेपर्यंत बंद करण्यात आला आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू, दूध, भाजीपाला, फळे, बेकरी, चिकन आणि मटणाची दुकाने तसेच घरपोच सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये बदल करण्यात आला असून जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्नधान्य, किराणा दुकाने, दूध डेअरी, औषधांची दुकाने  सुरू राहणार आहेत, तसेच  सोमवारपासून ठाणे जिल्ह्यात घरपोच मद्य विक्रीला सुरुवात करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळून ही विक्री होईल. किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या दुकानांबाहेर उत्पादन शुल्क विभागामार्फत दुकानदाराचे क्रमांक दिले जातील. त्यावर व्हॉट्सअ‍ॅप अथवा लघू संदेशाद्वारे मद्याची नोंदणी करून घरपोच मद्य खरेदीचा लाभ परवानाधारक ग्राहकांना घेता येईल. अशी माहिती ठाणे महापालिकेने दिली.


महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी, वागळे इस्टेट, लोकमान्य-सावरकरनगर, घोडबंदरपाठोपाठ आता शहराच्या मध्यवर्ती भागातील खारकर आळी आणि जांभळीनाका परिसरातील घाऊक किराणा बाजारपेठ १७ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी प्रशासनाने घेतला. शहरातील नौपाडा परिसर अजूनही पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाही. पण ठाण्याचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असलेल्या खारकर आळीमध्ये एक करोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्याच परिसरात घाऊक किराणा बाजारपेठ आहे. या ठिकाणी शहरातील किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे  खारकर आळी, जांभळीनाका भागातील घाऊक किराणा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नौपाडय़ातील नागरिकांसाठी भगवती शाळेच्या मैदानात तात्पुरती भाजी मंडई उभारण्यात आली होती. ही भाजी मंडई बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad