कंत्राटी कामगारांनाही प्रोत्साहन भत्ता मिळावा - अॅड. प्रकाश आंबेडकर
मुंबई
कोरोनाच्या संकटकाळात महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांबाबत भेदभाव करु नये. त्यांनाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईसह देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई रेड झोन मध्ये आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत असले तरी मनपाचे आपत्कालीन कर्मचारी जीवावर उदार होऊन लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहे.
हे कर्मचारी आपल्याला २४ तास पाणी, वीज मिळावी यासाठी कार्यरत आहेत. तर शहरात कचऱ्याची, सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून चतुर्थश्रेणी कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कोरोना काळात प्रोत्साहन भत्ता दिला जातो. त्यासाठी संघटना आणि सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत केलेली आहे. तरीही कायमस्वरूपी कामगार सोडल्यास कंत्राटी आणि स्वयंसेवी संस्थेच्या कामगारांना प्रोत्साहन भत्ता दिला जात नाही. त्यांच्यात भेदभाव केला जातो. याबाबत अनेक कामगारांच्या तक्रारी आलेल्या आहेत. सर्वांचे काम समान असूनही समान वेतन नाही. प्रोत्साहन भत्ता न देणे, हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा भेदभाव दूर करावा आणि कोरोना काळात सर्वांना नियमित प्रोत्साहन भत्ता त्यांना देण्यात यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
0 टिप्पण्या