Top Post Ad

मजुरांनी कोणतेही पैसे न भरता नजीकच्या पोलीस स्टेशनवर नाव नोंदणी करावी- जिल्हाधिकारी

जिल्ह्यात सर्वांना पुरेशा आणि मोफत आरोग्य सेवा लवकरच

नागरिक समन्वय समितीला, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आश्वासन

 



 

ठाणे 

 

जिल्ह्यातील ज्या ज्या मजुरांना आपल्या मूळ गावी परतायचे आहे, त्यांना या महिन्याअखेर पर्यंत व्यवस्थित रवाना करण्यात येईल, मात्र संख्या खूप असल्याने उत्तर प्रदेश आणि वादळी परिस्थितीमुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथील मजूर रवाना करण्यास अधिक काळ लागू शकतो, मजुरांनी कोणतेही पैसे न भरता नजीकच्या पोलीस स्टेशनवर नाव नोंदणी करावी, मुंबईतून मोठ्या प्रमाणात मजूर ठाण्यात बस गाड्या पकडण्यासाठी आल्यामुळे ठाण्यावर थोडा ताण पडला. मात्र आता जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातले असून, मुंबईहून मोठ्या प्रमाणात वाहन व्यवस्था होत आहे, असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

 

  कोरोना संकटाशी मुकाबला करतांना, मुख्यतः रेशन - वेतन - आरोग्य आणि परिवहन या आघाड्यांवर शासकीय यंत्रणेशी समन्वय साधण्यासाठी शासन नागरिक समन्वय समितीच्या ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आज २२ मे रोजी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. समितीच्या वतीने कोकण समन्वयक डॉ. संजय मंगला गोपाळ, जिल्हा समन्वयक जगदीश खैरालिया आणि शहर समन्वयक अजय भोसले या चर्चेत सहभागी झाले होते.
कोविद - १९ या महामारीशी मुकाबला करतांना, हे अभूतपूर्व संकट अचानक कोसळल्यामुळे त्यावरील उपाय योजना अमलात आणतांना शासकीय यंत्रणेला खूप मर्यादा पडत असल्या तरी आता त्यावर यशस्वी मात करण्याचे प्रयत्न फलद्रुप होत असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. 


 

मजुरांच्या नोंदणीत काही दलाल घुसले असून काही नोंदणी केंद्रांवर भ्रष्टाचार होत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी अशा केंद्रांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या ठिकाणी कोणीही पैसे मागितल्यास देऊ नये, असे बोर्ड लावण्याचेही त्यांनी मान्य केले. मुळात पहिल्या लॉक डाउन आधीच मजुरांना मूळ गावी जाण्यासाठी अवधी दिला असता तर हे संकट इतके तीव्र झालेच नसते, या शिष्टमंडळाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी निरुत्तर झाले होते. 

 

रेशन कार्ड वा अन्य कोणतेही कार्ड असो वा नसो, सर्वांना रेशन धान्य पुरवठा याच आठवड्यात सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे शहर विभागात अशा कुटुंबांची नोंदणी सुरु असून, नागरिक समन्वय समितीने आपल्याकडील अशी नावे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावीत, असे त्यांनी सुचविले. समता विचार प्रसारक संस्था, श्रमिक जनता संघ, जाग, म्यूज फौंडेशन आदी संस्थांनी केलेल्या आअन्नधान्य वाटपा बद्दल त्यांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले. ठाणे महापालिकेने काही इस्पितळां बाहेर कोविद चाचणी आणि उपचाराचे दर पत्रक लावले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर, पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना सध्या काही मूल्य मोजावे लागत आहे, हे त्यांनी कबुल केले. मात्र लवकरच सर्वांनाच ही सेवा मोफत करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरु आहे, असे ते म्हणाले. कंत्राटी आणि नियमित कामगारांच्या वेतन, विमा कवच, सुरक्षा साधने आणि अन्य सोयी सुविधांबाबत महापालिका आणि श्रम आयुक्तांकडे पाठपुरावा करण्याचेही त्यांनी मान्य केले.

 

प्रत्यक्ष फिल्ड वर स्वयंसेवी समितीच्या प्रतिनिधींचे सहकार्य घेण्यास, सुरक्षेच्या कारणामुळे मर्यादा पडत असल्या तरी वेळोवेळी भेटून सल्ला मसलत करण्याचे मान्य करून, अशा बैठका नियमितपणे घेऊ,असेही ते शेवटी म्हणाले. निवासी जिल्हाधिकारी पाटील, नोडल अधिकारी रेवती गायकर, स्थलांतरित मजूर परिवहन व्यवस्था प्रमुख पोलीस उपायुक्त भाऊसाहेब पाटील आदी अधिकारी करीत असलेल्या सहकार्याबद्दल समितीने सर्वांना धन्यवाद दिले. काही अपरिहार्य कारणांमुळे, नियोजित वेळेच्या थोडी उशिरा बैठक सुरु होऊनही सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत सर्वच संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचे नंतर, समितीचे जिल्हा समन्वयक जगदीश खैरालिया यांनी सांगितले. 

 

ठाण्यात रेशन, मूळगावी परत प्रवास,आरोग्य सेवा आणि कामगारांवर वेतन किंवा अन्य अन्याय या संदर्भात सहकार्य लागल्यास, समितीशी ९७६९२८७२३३ किंवा ८१०८९४९१०२ किंवा ९८६९९८४८०३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, समितीचे शहर समन्वयक अजय भोसले यांनी केले आहे.         


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com