रत्नाकर मतकरी यांच्या आकस्मित निधनाने, वंचितांचा रंगमंच पोरका झाला

रत्नाकर मतकरी यांच्या आकस्मित निधनाने, वंचितांचा रंगमंच पोरका झालाठाणे


२०१४ सालापासून गेली सहा वर्षे, ठाण्यातील लोकवस्तीत राहणाऱ्या कुमार - युवा - महिलांना आपले विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी रंगमंचाची दालन खुले करून देणाऱ्या रत्नाकर मतकरी यांच्या आकस्मित निधनाने, समता विचार प्रसारक संस्थेचा वंचितांचा रंगमंच पोरका झाला, अशा शब्दात संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी आणि नाट्य जल्लोषच्या संयोजक हर्षदा बोरकर यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. वस्तीतील प्रश्न तिथल्याच लोकांनी त्यांच्याच भाषेत व्यक्त करावे अशी संकल्पना रत्नाकर मतकरींनी वंचितांचा रंगमंचच्या माध्यमातून मांडली आणि काही प्रमाणात साकारलीही होती. त्यासाठी, लोकवस्तीतल्या मुली मुलांसाठी गेली सहा वर्षे नियमितपणे ठाण्याला भेट देणाऱ्या मतकरींनी एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहात, वस्त्या वस्त्यात फिरून ही अभिनव चळवळ रुजविण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत परिश्रम घेतले.


 मतकरी सर अचानक आपल्याला सोडून कसे गेले. या भावनेने वस्तीतील मुली मुले अजूनही सैर भैर अवस्थेत आहेत. गेल्या सहा वर्षात शंभरहून अधिक नाटिका उभारण्याच्या कामात सहभागी असणारे सर आता आपल्यासोबत नसणार ही भावना मुलांना सहन होताना दिसत नाही, अशा शब्दात संस्थेच्या उपाध्यक्ष लतिका सु. मो. आणि सचिव हर्षलता कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मतकरींनी हे जे अनोखे नाट्य चळवळीचे रोपटे ठाण्यात लावले आहे ते भविष्यात राज्यभर नेण्याचे त्यांचे स्वप्न होते. अशी माहिती नाट्य जल्लोषच्या पूर्व संयोजक मीनल उत्तूरकर यांनी दिली. मतकरी सर आता नसले तरी त्यांनी दिलेली प्रेरणा आणि शिकवण आमच्या हृदयात कोरलेली आहे. त्याच्या प्रकाशात, वंचितांचा रंगमंच ही चळवळ अधिक जोमाने फोफावेल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असा निर्धार वंचितांचा रंगमंचावरील, संस्थेचे एकलव्य कार्यकर्ते सुनील दिवेकर, संजय निवंगुणे, अनुजा लोहार, अजय भोसलें, लता देशमुख आणि लोकवस्तीतील कलाकार चेतन दिवे, विश्वनाथ चांदोरकर, संदीप जाधव आदींनी व्यक्त केला आहे.  


समाजातील दलित - पीडित - वंचित समाजासाठी मतकरी प्रथमपासूनच सक्रिय असत. साहित्यिकाने सामाजिक भूमिका आग्रहाने घेतली पाहिजे आणि त्यासाठी किंमतही दिली पाहिजे. मात्र शोषित वंचितांच्या पाठी ठामपणे उभे राहिले पाहिजे असा त्यांचा कृतिशील बाणा सुरुवातीपासून होता, अशी आठवण संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया यांनी जागवली. १९७८ साली मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याविरोधात,  मराठवाड्यात दलितांवर झालेल्या अत्याचारा विरोधात लोककथा अठ्ठ्यात्तर हे नाटक मतकरींनी त्या काळात लिहिले होते. नर्मदेच्या खोऱ्यात आदिवासी - शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात मेधा पाटकर यांनी उभारलेल्या चळवळीत मतकरींनी सहभाग घेतला होता. तिथे राहून चित्रे काढली होती. अलीकडेच ती मुंबईत प्रदर्शितही करण्यात आली होती.


समता आंदोलनाच्या परित्यक्ता मुक्ती आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्या प्रश्नावर नंतर त्यांनी एक टेलिफिल्मही काढली होती. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीतही त्यांचा सहभाग होता. मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले होते. त्याचाच पुढचा प्रवास म्हणजे मतकरींना पडलेले, वंचितांचा रंगमंच हे अनोखे स्वप्न! अशा शब्दात संस्थेचे संस्थापक डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी मतकरींच्या सामाजिक बांधिलकीचा प्रवास सांगितला आणि त्यांची स्वप्ने साकारण्याचे बळ कार्यकर्त्यांना मिळू दे, अशी भावना व्यक्त केली.     


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad