गावी जाण्यासाठी मजुरांचा आटापिटा
नवी मुंबई
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. ४० दिवसांचा कालावधी उलटला आहे. यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. सर्वच शहर परिसरात मजूर आणि कामगार मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत. हे मजूर कोणत्याही वाहनातून गावी जाणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत असली तरी पनवेल परिसरात मजूर म्हणून काम करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील 30 मजूरांनी मात्र अकोला जिल्ह्यातील आपल्या घरी जाण्यासाठी शिरवली जंगलाचा मार्ग धरला. डोंगर पार करीत ते प्रवास करीत आपल्या गावी निघाले.
महिला आणि पुरुषांचा भरणा असलेल्या या 30 मजूरांनी गुरुवारी दुपारी पनवेल सोडले. तेथून शिरवली जंगलातून डोंगर चढून पेव किल्ल्यावर पोहचले. तेथून खाली उतरण्यासाठी प्रवास सुरु केला. डोंगर चढून आलेले मजूर हे पुन्हा डोंगर उतरून खाली उतरले आणि नेरळ येथे स्थानिक आदिवासी लोकांच्या नजरेला पडले. त्यानंतर आनंदवाडी येथील आदिवासी लोकांनी ही बाब मोहाचीवाडीतील कार्यकर्त्यांना सांगितली.
सर्व मजूर पुन्हा पनवेलमध्ये दाखल सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील आणि महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप यांनी घटनास्थळी जाऊन सर्व मजूरांना सूचना देऊन शुक्रवारी सकाळी पुन्हा आले त्या ठिकाणी परत जाण्याचे आदेश दिले. त्या सर्व 30 मजुरांची राहण्याची व्यवस्था तेथील एका इमारतीमध्ये तर रात्रीच्या जेवणाची व्यवस्था स्थानिक रहिवासी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान चव्हाण यांनी केली. सर्व मजूर पुन्हा पनवेल येथे पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले. बाहेरील मजूर आल्याची माहिती मिळताच नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक पथक तात्काळ तेथे पोहचले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकाने सर्व मजुरांची तपासणी करून घेतली. नेरळ पोलिसांनीही तेथे येऊन सर्व मजूरांना सायंकाळी त्याच ठिकाणी थांबवले.
0 टिप्पण्या