मद्यविक्रीचा नवा मार्ग तांत्रिक अडचणीचा
ठाणे
ठाणे जिल्ह्य़ात घरपोच मद्यविक्रीला गुरुवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी परवानगी दिली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन दिवसांत जिल्ह्य़ातील १९० पैकी ९५ मद्यविक्रेत्यांना ओळखपत्र दिले आहे. ज्या ग्राहकांकडे मद्य परवाना आहे. त्यांनाच मद्य मिळणार असल्याचे या निर्देशात म्हटले आहे. मद्य ग्राहकाला वर्षभरासाठी १०० किंवा आजीवन परवान्यासाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागते. परवाना नसताना मद्य बाळगणे वा विनापरवानाधारकास मद्य विक्री करणे हा गुन्हा आहे. एखाद्याकडे मद्य परवाना नसेल तरीही विक्रेत्यांनी अशा ग्राहकांना ठरावीक दर आकारून तात्काळ परवाना उपलब्ध करून मद्य खरेदीस उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. परवानाधारक ग्राहकांनाच घरपोच मद्यविक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मद्य परवान्यासाठी ग्राहकांनी राज्य उत्पादन शुल्कच्या संकेतस्थळाकडे धाव घेतली आहे. तरीही गेल्या चार दिवसांत त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात नव्या परवान्याचा पर्यायच उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे मद्यशौकिनांना ऑफलाइन अर्जासाठी निरीक्षक आणि अधीक्षक कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत
आवश्यक परवाना राज्य उत्पादन शुल्काच्या Exciseexciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर त्यावर एक पर्याय देण्यात आला होता. त्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर परवाना उपलब्ध होणार होता. मात्र, तीन दिवसांपासून संकेतस्थळावर पर्यायच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवा परवाना काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या मद्यप्रेमींची संकेतस्थळावर पर्यायाची शोधाशोध होऊ लागली आहे.उपाय म्हणून काही दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि अधीक्षक कार्यालयात ऑफलाइन अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. येत्या काळात हे संकेतस्थळ सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. असे असले तरी ठाण्यातून सुमारे १८०० जणांचे ऑनलाइन परवाने देण्यात आल्याचा दावा राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने केला आहे.
0 टिप्पण्या