.... आणि विमानाला आकाशातून पुन्हा मागे यावे लागले
नवी दिल्ली
वंदे मातरम मिशन अंतर्गत जगभरातल्या अनेक देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आज ३० मे रोजी मॉस्को इथं A-320 हे विमान पाठविण्यात आलं होतं. मात्र त्यातच एका चुकीमुळे सगळ्यांनाच फटका बसला. दिल्ली विमानतळावरून मॉस्कोसाठी निघालेल्या एका विमानाचा पायलटच कोरोना पॉझेटिव्ह निघाल्याने दिल्ली विमानतळावर एकच गोंधळ उडाला. आकाशात असलेल्या त्या विमानाला तातडीने परत बोलाविण्यात आलं. आता विमानातले सर्व कर्मचारी क्वारंटाइन करण्यात आले आहेत. विमान दिल्ली विमानतळावर सुखरुप पोहोचले आहे.
नियमांनुसार विमान निघण्याआधी सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बघितला जातो. त्यानुसार आजही सर्व कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट बघितला गेला. मात्र नजर चुकीमुळे पायलटचा रिपोर्टही निगेटिव्ह असल्याचं समजलं गेलं. मात्र काही वेळाने जेव्हा पुन्हा रिपोर्ट बघण्यात आला तेव्हा तो पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आलं आणि सर्वांचिच धावपळ उडाली. नियंत्रण कक्षाने तातडीने विमान परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी विमान उझबेकिस्तानवर उड्डाण करत होतं. निरोप मिळताच विमानाने परतीचा प्रवास सुरू केला आणि दुपारी साडेबारा वाजता विमान दिल्ली विमानतळावर पोहोचलं. आता सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. विमान आता सॅनिटाइज करण्यात येणार असून मॉस्कोसाठी दुसरं विमान पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 टिप्पण्या