महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने २४ हजाराहून अधिक मजुरांच्या प्रवासाचे नियोजन

राज्यातील २७ हजार स्थलांतरीत मजुरांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने स्वखर्चाने गृहराज्यात मूळगावी पाठवलेः बाळासाहेब थोरात


२४ हजाराहून अधिक मजुरांच्या प्रवासाचे नियोजन सुरु, त्यांनाही लवकरच त्यांच्या मूळगावी पाठवणार   
 
 मुंबई,काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी केलेल्या घोषेनुसार लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध जिल्ह्यात अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांना त्यांच्या गृहराज्यात मुळगावी पाठवण्यासाठी पुढाकार घेतला असून आजपर्यंत 27 हजार 865 स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने त्यांच्या प्रवासाचा खर्च उचलून त्यांना मूळगावी पाठवले आहे.
देशभरात विविध भागात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना केंद्रातील मोदी सरकारने वाऱ्यावर सोडले होते. आपल्या गावी जाण्यासाठी हजारो मजूर पायी चालत निघाले होते तर काही जण मिळेल त्या मार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. हे विदारक चित्र पाहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या मजुरांना मुळगावी पाठवण्याचा खर्च काँग्रेस पक्ष करेल असे जाहीर केल्यानंतर प्रदेश काँग्रेसने तात्काळ सक्रीय होत मजुरांना गृहराज्यात पाठवण्याचे काम हाती घेतले. मजूरांच्या नोंदणीसाठी जिल्हानिहाय हेल्पलाईन सुरु केल्या व नोंदणी केलेल्या मजूरांसाठी विशेष रेल्वेची सोय केली.


नागपूर ते मुज्जफरपूर, नागपूर ते लखनऊ, वर्धा ते पाटणा, पुणे ते लखनऊ, नागपूर ते दरभंगा, मिरज ते गोरखपूर, चंद्रपूर ते पाटणा, पुणे ते भोपाळ, अहमदनगर ते उन्नाव, नागपूर ते बलिया या विशेष श्रमिक रेल्वे आणि मुंबईतूनही राजस्थान, बिहार आणि उत्तरप्रदेश मध्ये जाणाऱ्या बहुतांश मजुरांचा खर्च काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.
प्रवासादरम्यान या मजुरांना भोजन, मास्क, सॅनिटायझर आदी सुविधांचीही व्यवस्था काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 4 विशेष रेल्वे, मंत्री डॉ. विश्वजीत कदम व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी प्रत्येकी 2 विशेष रेल्वेचा खर्च केला तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही मोठ्या प्रमाणावर मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलला.


   सातारा, अहमदनगर, पुणे, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील 3567 मजुरांना खासगी बसेसमधून त्यांच्या गृहराज्यात पाठविण्यात आले. त्यांचाही प्रवास व इतर सर्व खर्च काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला.
संगमनेर येथून परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजुरांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या, त्यासोबतच जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षातर्फे कोल्हापुरामधून परराज्यात प्रवास करणाऱ्या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने मजुरांकडून प्रवासाच्या सोईबाबत विचारणा होत असून उत्तरप्रदेशातील 18 हजार मजुरांनी प्रदेश काँग्रेसच्या जिल्हानिहाय हेल्पलाईनकडे तशी नोंदणी केली आहे. याशिवाय बिहार, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, ओडीसा, प. बंगाल, कर्नाटक, गुजरातसह इतर राज्यांतून 24 हजारांहून अधिक मजुरांनी महाराष्ट्र काँग्रेसशी संपर्क केला आहे. त्यांच्या प्रवासासंदर्भात नियोजन सुरु असून लवकरच त्यांनाही त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad