स्मार्ट सिटीत नाल्याच्या प्रवाह वळवून मोठ्या प्रमाणावर टोलेजंग इमारती
ठाणे
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे नाल्याच्या प्रवाह वळवून १०० एकर भागात मोठ्या प्रमाणावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत..नाल्याचे प्रवाह इतरत्र वळविल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते त्यामुळे रोगराई पसरणार आहे. ठामपा अधिकाऱ्यांच्या आर्थिक साटेलोटेमुळे शहरातील अनेक इमारती किंवा कॉम्प्लेक्सनी नाल्याचे प्रवाह बदलून मोठं मोठ्या इमारती उभारल्या आहेत. मात्र यामुळे पावसाळ्यात प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकार सुरु आहे. परंतु केवळ पावसाळा आला, पाणी साचले की हा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यानंतर तेरी भी चूप मेरी भी चूप असा एकंदर प्रकार सुरु असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
हिरानंदानी इस्टेट परिसरात खाडीचा प्रवाह देखील बंद होण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अटी आणि शर्थीचे पालन केले जात नाही असा आरोपही स्थनिक नागरिकांनी केला आहे. घोडबंदर रोड वरील हिरानंदानी इस्टेट परिसरात १०० एकर क्षेत्रावर मागील १० वर्षपासून टाऊन शिपचे काम सुरू आहे. बेकायदेशीरपणे या ठिकाणी भरणी टाकण्यात आलेली आहे. त्यातच नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते आणि सांडपाणी वाहून नेणारे गटारे आणि नाले यांचा प्रवाह बंद करून इतरत्र वळविण्यात आलेला आहे. यामुळे या परिसरात पाणी साचण्याचा अनुभव मागील पावसाळ्यात आला आहे. पावसाळा जवळ आला असल्याने शहरातील नाल्याचे प्रवाह बदलण्याबरोबरच ड्रेनेजचे काम देखील सुरू आहेत. नाल्यात ड्रेनेजचे पाईप लाईन देखील टाकण्यात आले आहेत. त्यातच पालिकेच्या ड्रेनेज विभागाची देखील हद्द म्हणजे कोलशेत येथील ढोकळी मधील नाला क्रमांक ९ ची भिंत चक्क व्यावसायिकाने तोडून त्या ठिकाणी वहिवाट रस्ता तयार केला आहे. याबद्दल महापालिका याच्यावर कारवाई का करीत नाही असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.
ठाणे शहरातील हिरानंदानी, लोढा, कल्पतरू,सारख्या विकासकांनी तर शहरात पाण्याचा निचरा ठेवण्यासाठी जागाच ठेवलेली नाहीये. एकीकडे पालिका स्मार्ट होत असतानाच दुसरीकडे नाल्याचे प्रवाह बदलून तसेच खाडी मधील तिवरांच्या झाडाची कत्तल करून मोठमोठाले प्रकल्प उभारले जात आहेत. सदरचे इमारत व्यवसायिकानी कोणाचे अभय आहे हा प्रश्न कायमच आहे. पालिकेच्या वतीने त्यांना केवळ नोटिसा बजावण्याची तकलादू कारवाई केली जाते. त्यावर कोणतीही ठोस अॅक्शन घेतली जात नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांना अनधिकृत इमारतीच्या नावाखाली बेघर केले जाते. यावर सर्व नगरसेवक गप्प का असा प्रश्नही ठाणेकर विचारत आहेत.
0 टिप्पण्या