संकटकाळात गलिच्छ राजकारण करण्याचा डाव जनतेने हाणून पाडला- सचिन सावंत

#महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड देशात पहिल्या क्रमांकावर


संकटकाळात गलिच्छ राजकारण करण्याचा भाजपचा डाव जनतेने हाणून पाडला


इभ्रत वाचविण्यासाठी भाजपने घेतली उत्तर प्रदेश, बिहारच्या ट्रोल्स आणि बॉट्सची मदत


मुंबई,
महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटाशी लढत असताना सत्तेकरिता हपापलेल्या भाजपचा महाराष्ट्राचे राजकीय रणांगण करण्याचा प्रयत्न राज्यातील सूज्ञ जनतेने हाणून पाडला असून महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे सुरु करण्यात आलेल्या #महाराष्ट्रद्रोहीBJP या ट्वीटर ट्रेंडला उस्फूर्त प्रतिसाद देऊन भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा उघडा पडला आहे. इभ्रत वाचविण्यासाठी शेवटी भाजपावर उत्तर प्रदेश, बिहारच्या ट्रोल्स आणि बॉट्सची मदत घेण्याची नामुष्की ओढावली अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना ऐवजी सरकारला शत्रू समजणा-या भाजप नेत्यांनी महाराष्ट्र बचाओ नावाचे आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाकडे जनतेसोबतच भाजप कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवली. महाराष्ट्र भाजपातर्फे सरकारच्या प्रयत्नांवरती आक्षेप घेतला जात आहे. सरकार वैज्ञानिक दृष्टीकोनातून कोरोनावर मात करण्याकरिता प्रयत्न करत आहे हे भाजप नेत्यांच्या पचनी पडत नसावे. टाळ्या, थाळ्या वाजवून, दिवे लावून किंवा दोरीच्या उड्या आणि बेडूक उड्या मारून कोरोना पळून गेला असता अशी भाजप नेत्यांची अपेक्षा असावी असा टोला सावंत यांनी लगावला.
१ लाख २५ हजारांपेक्षा अधिक ट्वीट #महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटॅग वापरून करण्यात आले. देशपातळीवरील आयटी सेलचे कार्यकर्ते, पेड ट्रोल आणि बॉट्स वापरून देखील भाजपच्या इंग्रजी मधील महाराष्ट्र बचाओ आंदोलनाला जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या पेड ट्रोल आर्मीकडून महाराष्ट्र बचाओ हा हॅशटॅग ट्रेंड करण्याचा प्रयत्नही महाराष्ट्रद्रोहच आहे असे सावंत म्हणाले. संकट काळातही गलिच्छ राजकारण करणा-या भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीला उघडे पाडल्याबद्दल सावंत यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad