रबाळे एमआयडीसीत 'कोरोना'चा शिरकाव तरीही 'सुल्झर पंप्स्' कंपनी सुरूच

रबाळे एमआयडीसीतील 'सॅन्डोज'च्या सहाजणांना 'कोरोना'ची लागण होऊनही,


हाकेच्या अंतरावरील 'सुल्झर पंप्स्' कंपनी अद्यापही सुरूच !


 कंपनी व्यवस्थापनाकडून लॉकडाऊनची ऐशी-तैशी...


 नवी मुंबई


रबाळे एमआयडीसीमधील 'सॅन्डोज' या औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपनीतील एका इंजिनियरसह, सहा कामगारांना 'कोरोना'ची लागण झालेली असून, या सर्वांना ठाण्यातील 'वेदांत हॉस्पिटल' या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर कामगारांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून, नवी मुंबईतील हॉटेल विस्टाईन आणि साऊथ कोस्ट येथे विलगीकरणाखाली ठेवण्यात आलेले आहे.


याच पार्श्वभूमीवर 'धर्मराज्य पक्ष'प्रणीत 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी, 'सॅन्डोज' कंपनी व्यवस्थापनाने शासनाने निर्देशित केलेले 'सोशल डिस्टन्सिंग'चे नियम न पाळल्यामुळेच कामगारांना 'कोरोना'चा प्रादुर्भाव झाल्याचा आरोप करीत, यासंदर्भात ठाणे कामगार उपायुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त, रबाळे पोलीस स्टेशन आणि 'सॅन्डोज' व्यवस्थापनाचे एच.आर. मॅनेजर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. याबाबत २४ मार्च रोजी युनियनच्या वतीने पत्र लिहिण्यात आले होते. त्यात शासनाकडून परवानगी देण्यात आलेली असली, तरी 'सोशल डिस्टन्सिंग'चे निकष पाळण्याचे सुचविण्यात आले होते. परंतु, 'सॅन्डोज' व्यवस्थापनाकडून शासकीय आदेश पाळण्यात न आल्यानेच कामगार कोरोनाबाधीत झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून व्यवस्थापनाने पूर्णपणे कंपनी बंद ठेवलेली असली, तरी दुसरीकडे मात्र, याच कंपनीपासून अवघ्या दोनशे ते अडीचशे मिटर्सच्या अंतरावर असणाऱ्या 'सुल्झर पंप्स्' कंपनीने उत्पादन प्रक्रिया सुरूच ठेवून व शासनाचे सर्व आदेश धाब्यावर बसवून 'लॉकडाऊन'ची ऐशी की तैशी केल्याचे उघड झाले आहे. 


अधिक माहिती अशी, केंद्र सरकारने ३ मे-२०२० रोजीपासून संपूर्ण 'लॉकडाऊन'चे आदेश दिलेले असतानाही, दिघा येथील 'सुल्झर पंप्स्' या कंपनीने १५ एप्रिलपासून उत्पादनाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीचे उत्पादन हे अत्यावश्यक सेवा प्रकारात येत नसतानादेखील, 'सुल्झर' व्यवस्थापनाने शेकडो कामगारांचा जीव धोक्यात घालण्याच्या उद्देशाने उत्पादन निर्मिती सुरू केल्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीकडून उत्पादनासंदर्भातील परवानगी मिळाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी तसे कोणतेही पत्र 'सुल्झर' व्यवस्थापनाने कामगार, युनियन किंवा युनियनच्या अध्यक्षांना दाखविण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. संतापजनक बाब म्हणजे, १५ एप्रिलपासून कंपनी सुरू झाली त्यावेळी, कामावर रुजू होणारे कामगार हे विविध जिल्ह्यांतून येऊन, तसेच त्यापैकी तीन व्यवस्थापकीय मंडळी पुण्यावरून आलेली आहेत आणि ती बिनधास्तपणे कामगारांमध्ये वावरत आहे, ऊठबस करीत आहेत. ही बाब कामगारांनी  कंपनी व्यवस्थापनेच्या निदर्शनास आणूनही, व्यवस्थापनाने साफ दुर्लक्ष करीत, त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही.


यासंदर्भात ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांपासून ते संबंधित विभागांच्या सर्व अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करूनही, अद्यापपर्यंत सदर कंपनी सुरूच ठेवण्यात आलेली असल्याने, 'सॅन्डोज' कंपनीसारखीच दुर्दैवी वेळ 'सुल्झर' कंपनीच्या कामगारांवर आल्यास, त्यास पूर्णपणे व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशारा महेशसिंग ठाकूर यांनी  दिला आहे. नवी मुंबईच्या रबाळे एमआयडीसीमधील दिघा औद्योगिक क्षेत्रातील या दोन्ही कंपन्यांमध्ये 'राजन राजे' यांची युनियन असून, निव्वळ स्वतःची भांडवलदारी मुजोरी दर्शवण्यासाठीच कामगारांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे महासचिव महेशसिंग ठाकूर यावेळी पत्रकारांशी बोलताना शेवटी केला आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA