डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातूनच बुद्ध वंदना घ्यावी - मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई.
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासियांना संविधानाचा अमूल्य ठेवा दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळाला आहे. आज आपला देश प्रगतीकडे जात आहे, त्याचे कारण आपले ‘संविधान’ आहे. यासाठी प्रत्येक भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन आपले कर्तव्य बजावावे, मात्र यंदा देशासह राज्यावर कोरोना संकट असल्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना वंदन करावे असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
जगासह देशाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे देशभरात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत यशस्वी होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न राज्यसरकार करत आहे. अशावेळी गर्दी करून कोरोना नियंत्रणात व्यत्यय येणार नाही यासाठी यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोकांनी शांतता आणि संयम ठेऊन आपापल्या घरातच साजरी करावी असं आवाहन राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या