Top Post Ad

धारकऱ्यावरचा वार आवडला




धारकऱ्यावरचा वार आवडला



आयटी सेलच्या गेली सहा वर्षे धिंगाणा घातला होता. त्याच्याकडे कधीच कोणी लक्ष दिले नाही. आज जो प्रकार घडला त्यावरून अनेकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे काय चुकले, असा प्रश्न आव्हाडांना लक्ष्य करणाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. गेले अनेक वर्षे हा माणूस जीव तोडून काम करीत आहे. मनुवादी विचारधारेच्या लोकांना अंगावर घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे मधल्या काळात तर त्यांच्या घराची रेकी देखील करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या संरक्षणात वाढ करण्याऐवजी घट करण्याचे धोरण अवलंबले होते. त्यावेळी त्यांच्या जीविताची काळजी घेतली गेली नाही. आता या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय. वास्तविक पाहता पेड ट्रॉलर्स मंडळींनी अनेकांना जगणे नकोसे केले आहे. आय एम ट्रोल पुस्तकामध्ये या ट्रोलर्सचे उपदव्याप आणि त्यांनी मांडलेला उच्छाद उघडकीस आणला आहे. गेल्या काही दिवसात महिला पत्रकारांचा केलेला अपमान त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलींवर बलात्कार करण्याच्या दिलेल्या धमक्या; या सर्वांचा कधी विचारच केला गेला नाही. आजही या ट्रॉलर्सची अर्वाच्य भाषा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आणि विरोध करणारे सहन करीतच आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी या या ट्रॉलर पैकी एकाला दिलेला चोप पाहून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधकांना हायसे वाटले असेल. कारण, काम आणि अभ्यास याच्या बाबतीत डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करणे कोणालाच शक्य नाही. आज त्यांच्यावर टीका करणारे लोक कोरोनाच्या संकटात घराबाहेर पडत नाहीत. पण, जितेंद्र आव्हाड हे रात्रीचा दिवस करून लोकांच्या सेवेत स्वतःला झोकून देत आहे. लोकांना दिले जाणारे फूड पॅकेटमधील जेवण स्वतःही खात आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी भांडवल जमा केले आहे.
पण, कधी असा विचार केलाय का, आपल्याला आईवरून शिवी दिल्यावर किती राग येतो. मग, डाॅ. आव्हाड हे काय ट्रोलर्सच्या बापाचे खायला जातात का? त्यांनी आपल्या धर्माविषयीची आपली भूमिका अनेकदा जाहीर केली आहे. तरीही त्यांना विशेषणं लावून ट्रोल केले जात आहे. मग, त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणजेच ज्यांच्यावर डाॅ. आव्हाड भावासारखे प्रेम करतात, त्या कार्यकर्त्यांना राग आला तर चुकले कुठे?
विचारांची लढाई विचारांनीच लढायची असते. हेच तत्व आव्हाड यांचे दिसून येत आहे. म्हणूनच आपल्या अस्मितेचा म्हणजेच शिवराय-जिजाऊंचा अवमान झाला तेव्हा डाॅ. जितेंद्र आव्हाड हेच रस्त्यावर उतरले होते. पण, त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता. पण, हे किती दिवस चालणार? तुम्ही ठरवून बहुजनांना छळणार आणि त्या विरोधात बंड केले की गुन्हेगार ठरवणार? चार दिवसांपूर्वीच डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा धोका ओळखला होता. " बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना घराबाहेर पडू नका; बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी कोरोना वाढवला अशी आवई उठवण्यासाठी मनुवादी सज्ज आहेत," असे जाहीर करून मनुवादी धारकर्यांची डाॅ. आव्हाड यांनी गोची केली होती. हाच राग सोशल मिडीयाच्या माध्यमातून काढण्यात आला. डाॅ. आव्हाड यांना ट्रोल करण्यासाठी घाणेरडे चित्र तयार करण्यात आले होते. टीका करणार्यांचे असे चित्र तयार केले असते तर त्यांनी काय केले असते? हा प्रश्न स्वतःच्या मनाला वारंवार विचारा अन् नंतरच जितेंद्र आव्हाड यांना दोष द्या!
शंभुराजांपासून कलबुर्गी-दाभोलकर-लंकेश यांच्यापर्यंतचा इतिहास तपासला तर सुधारणावादी विचारधारा मांडणार्यांची एकतर बदनामी किंवा त्यांची हत्या करण्याची परंपरा येथील जातीयवादी मानसिकतेची आहे. पण, शंभूराजे यांचा अपवाद वगळता इतरांनी बदनामी करणार्यांना माफीच दिली होती. म्हणूनच जोतिबा फुले यांच्यावर मारेकरी घालण्यात आले. त्यातून ते बचावले होते. पण, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना आपले प्राण गमवावे लागले होते. म्हणून बदनामी करणारी ही किड ठेचणे अधिक गरजेचे होते. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ही किड ठेचली आहे. म्हणून चळवळीत काम करणारे अनेकजण त्यांचे अभिनंदनच करतील.
गोरगरिबांना, पत्रकार, विचारवंतांना धमकावणारे ट्रोलर्स आज फटकवले गेले आहेत. ही सुरूवात आहे. धारकरी सर्वांवर नेहमीच वार करण्याचा प्रयत्न करतात . सांगलीत डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर तो प्रयत्न केला होता. पण या धारकर्यावर केलेला हा वार मनापासून आवडला.


---  संजय भालेराव (ठाणे)





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com