Top Post Ad

पालघर हत्याकांडात माकप व ख्रिश्चन मिशनरी यांचा कट

पालघर हत्याकांड : सत्य काय आहे?


                             - डॉ. अशोक ढवळे
गेल्या आठवड्यात १६ एप्रिलला रात्रीच्या अंधारात, मुंबईहून सुमारे १५० किमी दुरीवर, पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात मॉब लिंचिंगची एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचा अर्थातच तीव्र निषेध केला पाहिजे आणि जे दोषी सिद्ध  होतील त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली पाहिजे. या घटनेत नेमके काय घडले? ते का घडले? आणि त्याचे राजकीय पडसाद काय उमटले? 
नेमके काय घडले?
दोन साधू व त्यांचा ड्रायव्हर मुंबईहून सुरतला एका मयतीसाठी जात होते. त्यांची नावे होती महंत कल्पवृक्ष गिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि नरेश येलगडे. त्यांच्याकडे लॉकडाऊनमधील प्रवासाचा पास नव्हता. पोलिसांनी त्यांना अडवले असते. म्हणून थेट मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून न जाता ते डहाणू तालुक्याच्या अत्यंत दुर्गम भागातील छोट्याशा रस्त्याने गेले. हा रस्ता दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या मार्गे गुजरातला जातो.  हा संपूर्ण भाग अतिशय मागास आणि पूर्णतः आदिवासी पट्टा आहे. हे साधू गडचिंचले गावातून गेले, त्यांना तेथील फॉरेस्ट गार्डने पुढे जाऊ दिले, पण पुढे एक किमी अंतरावर नगरहवेलीच्या गार्डसनी त्यांना पुढे जाण्यास परवानगी नाकारली आणि त्यांना परत पाठवले. ते त्याच रस्त्यावरून परत आले आणि तेथे गडचिंचलेच्या फॉरेस्ट गार्डने त्यांना अडवले. तेथे गंभीर प्रसंग सुरू झाला. रात्री ९ ची वेळ होती आणि घटनाक्रम पुढील दोन तास सुरू राहिला. ४०० लोकांचा जमाव गोळा झाला आणि त्यांनी हे साधू चोर असल्याचे, मुलांना पळवून नेण्यासाठी आले असल्याचे आरोप सुरू केले. मोजके पोलीस तेथे पोचले, पण मोठा जमाव पाहून त्यांनी पोलिसांची ज्यादा कुमक मागवली. ती रात्री १० वाजता पोचली. संतप्त जमावाने साधूंची गाडी उलटी केली, आणि ही गाडी तसेच पोलिसांच्या गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी दोघांना पोलीस गाडीत नेऊन ठेवले होते, आणि फॉरेस्ट चौकीत बसलेल्या तिसऱ्या इसमाला पोलीस गाडीत घेऊन जात असताना प्रचंड हंगामा झाला. पोलिसांच्या नाकाखाली जमावाने या तिघांनाही लाठ्याकाठ्या आणि दगडांनी ठेचून मारून टाकले. 
"इंडियन एक्सप्रेस" ह्या मोठ्या इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रसिद्ध पत्रकार कविता अय्यर यांनी त्या भागाला प्रत्यक्ष भेट दिल्यावर लिहिले की, "हाच या शोकांतिकेतील - आणि आगामी चौकशीतील - कळीचा मुद्दा आहे: पोलीस त्या जागी पोचले तेव्हा या तिघांना इजा झाली नव्हती आणि पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांची हत्या झाली." 
या धक्कादायक घटनेनंतर लगेच, पोलिसांनी आपली कर्तव्यशून्यता झाकण्यासाठी गडचिंचले गावच नव्हे, तर या परिसरातील अनेक गावांतील निरपराध लोकांना अटक करण्याची धडक मोहीमच हाती घेतली. अशा प्रकारे ९ लहान मुलांसह ११० लोकांना अटक करण्यात आली. लॉकडाऊन आणि भीतीच्या काळात रात्रीच्या वेळेस आजूबाजूच्या गावांतील लोक गडचिंचलेला येऊन या हत्याकांडात सहभागी होण्याची सुतराम शक्यता नव्हती. 
हा भयानक प्रकार का घडला?
लॉकडाऊनच्या काळात गेले काही आठवडे केवळ या विभागातच नव्हे, तर पालघर जिल्ह्याच्या शेकडो आदिवासी गावांत व्हाट्सअप्प वरून खोटे आणि खोडसाळ संदेश मोठ्या प्रमाणात फिरत होते. या भागात चोर फिरत आहेत, ते विहिरींमध्ये थुंकून कोरोना पसरवत आहेत, ते लहान मुलांना उचलून घेऊन त्यांच्या किडनी काढत आहेत, अशा प्रकारचे ते संदेश होते. त्यामुळे सर्व परिसरात तणाव, घबराट आणि द्वेषाचे वातावरण तयार झाले होते. या परिसरातील अनेक गावांत लोक रोज रात्री जागता पहारा ठेवू लागले. गावात कोणी अनोळखी माणूस येऊ नये याकरता रस्त्यांवर दगड वगैरे रचून गावबंदी करू लागले. अफवा पसरवण्यामध्ये संघ परिवार देशभर कुप्रसिद्ध आहे. लॉकडाऊनमुळे उत्पन्न नाही, अन्न नाही, यामुळे परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण बनली. 
काही ग्राम पंचायतींनी व्हाट्सअप्प वरून पसरवल्या जाणाऱ्या अशा अफवांविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.  हत्याकांडाच्या दोनच दिवसांपूर्वी १४ एप्रिलला काही गावांत धान्य वाटप करण्यासाठी गेलेल्या डॉ. विश्वास वळवी नावाच्या एका आदिवासी डॉक्टरवर सारणी गावच्या लोकांनी हल्ला केला होता. त्यांना वाचवण्याकरता गेलेल्या पोलिसांवर व त्यांच्या गाडीवरही गावकऱ्यांनी हल्ला केला होता. सायवान, झाई, अंबोली, वाकी या गावांतही असे काही प्रकार घडले होते.  वास्तविक पाहता या घटनांमुळे पोलीस सतर्क व्हायला हवे होते. खोटे व्हाट्सअप्प संदेश कोण पाठवत आहे याचा तपास करून कारवाई करायला हवी होती. गावोगाव फिरून पोलिसांनी लोकांना आश्वस्त करून धीर द्यायला हवा होता. पण यापैकी काहीच झाले नाही. प्रत्यक्ष घटनास्थळी पोलिसांनी दाखवलेल्या कर्तव्यशून्यतेसोबतच हे सर्व प्रतिबंधात्मक उपाय पोलिसांनी का केले नाहीत याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.  हे साधू लॉकडाऊनमध्ये प्रवासाचा पास असल्याशिवाय का निघाले? पास असता तर ते थेट राष्ट्रीय महामार्गाने मुंबई ते सुरत सहज आणि लवकर जाऊ शकले असते. रात्रीच्या वेळेस ते या दुर्गम भागातून जाण्याची काहीच गरज पडली नसती. 
राजकीय पडसाद काय उमटले?
साधू मारले गेले हे कळताच भाजप आणि आरएसएस च्या काही नेत्यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीने साधूंच्या हत्येस मुसलमान जबाबदार आहेत असे आरोप करण्यास सुरुवात केली. दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमांतून या दुर्घटनेला धर्मांध रंग चढवण्याची निषेधार्ह मोहीमच त्यांनी लगेच सुरू केली. भाजपच्या हल्ल्यांचे दुसरे लक्ष्य होते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे राज्य सरकार. हे सरकार असताना साधूंची हत्या होतेच काशी काय, हा मुद्दा करून राज्य सरकारची अत्यंत बेजबाबदार बदनामी संघ परिवाराने सुरू केली. त्याचे खरे कारण हे होते की ऑक्टोबर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सर्व प्रकारच्या भानगडी करूनही भाजपला जबर फटका बसला. इतकेच नव्हे तर भाजपचा सर्वात जुना राजकीय सहकारी असलेल्या शिवसेनेला भाजपने फसवल्यामुळे त्याने भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत संयुक्त सरकार बनवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. यामुळे भाजपचा जो प्रचंड जळफळाट झाला तो अजूनही सुरूच आहे! शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिले. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात पुढील मुद्दे स्पष्टपणे मांडले. १. ही घटना गेली सहा वर्षे देशात अनेक ठिकाणी झालेल्या धर्मांध मॉब लिंचिंगच्या घटनांसारखी नव्हती. ती अफवांमुळे निर्माण झालेल्या गैरसमजातून घडली होती. २. या घटनेला कोणताही धर्मांध रंग नव्हता आणि तसा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करता कामा नये. ३. या प्रकरणात ५ प्रमुख आरोपींसह ११० लोकांना अटक झाली आहे आणि दोषी सिद्ध झालेल्यांवर कडक कारवाई केली जाईल. ४. दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित केले गेले आहे. ५. उच्चस्तरीय सीआयडी चौकशी सुरू झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या १०१ लोकांना अटक झाली आहे  (९ लहान मुले सोडून) त्यांची यादीच जाहीर केली आणि त्यात एकही मुसलमान नसल्याचे सांगितले. या घटनेचे धर्मांधकरण करणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला. 
पालघरच्या घटनेला धर्मांध रंग देण्याचा भाजप आणि आरएसएस यांचा प्रयत्न जेव्हा फसला तेव्हा त्यांनी स्थानिक पातळीवर त्यांना विरोध करणाऱ्या पक्षांवर चिखलफेक सुरू केली. संबित पात्रा, सुनील देवधर या त्यांच्या नेत्यांनी या हत्येला माकप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि कष्टकरी संघटना जबाबदार असल्याचा अत्यंत खोडसाळ व बिनबुडाचा आरोप समाजमाध्यमांवर केला.
आरएसएस चे मुखपत्र 'ऑर्गनायजर'ने २० एप्रिलच्या अंकात "पालघर हत्याकांडात माकप व ख्रिश्चन मिशनरी यांचा कट; महाराष्ट्र सरकारचे आणखी एक प्रशासकीय अपयश" या शीर्षकाखाली दिलेल्या बातमीत हा धादांत खोटा आरोप केला की, "पाच मुख्य आरोपी माकपचे असल्याचे सांगितले जाते." माकप आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांवर तोंडसुख घेतल्यानंतर ही बातमी म्हणते, "ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संबंध असलेल्या कष्टकरी नावाच्या एनजीओ च्या प्रमुख शिराझ बलसारा अटकेत असलेल्यांना जामीन मिळेल यासाठी काम करत आहेत. आता असा आरोप करण्यात येत आहे की या घटनेमागील सूत्रधार हे माकपचे स्थानिक आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे आहेत." 
आरएसएस कॉ. विनोद निकोलेंवर घसरण्याचे कारण उघड आहे. ऑक्टोबर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे आमदार पासकल धनारेचा पराभव करून डहाणूची जागा माकपतर्फे पुन्हा जिंकून आणली होती. माकपच्या तलासरी-डहाणू तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत एकजुटीने जबरदस्त काम तर केलेच, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि कष्टकरी संघटना या सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनीही माकपला सक्रिय समर्थन व मदत केली. माकपच्या विजयामुळे आरएसएस आणि भाजपचा प्रचंड जळफळाट झाला, तो त्यांनी अशा आचरट विधानांतून व्यक्त केला आहे. पाच मुख्य आरोपींमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एकही सभासद अजिबात नाही, असूही शकत नाही. उलट त्या पाच जणांमध्ये किमान तीन जण भाजपशी संबंधित आहेत अशी माहिती मिळाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संबित पात्रा, सुनील देवधर व इतरांवर बदनामीचा खटला भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि त्याची लगेच तयारी सुरू केली आहे.
खरी वस्तुस्थिती नेमकी उलट आहे, आणि ती झाकण्यासाठीच संघ परिवाराचा हा सर्व खोटारडेपणाचा खटाटोप चालला आहे. हे हत्याकांड जेथे झाले ते गडचिंचले गाव गेली १० वर्षे भाजपच्याच ताब्यात आहे. आज सुद्धा तेथील सरपंच चित्रा चौधरी या भाजपच्याच आहेत. आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुरावे आणि फोटो देऊन आरोप केला आहे की या प्रकरणात अटकेत असलेले दोघे जण - ईश्वर निकोले आणि भाऊ साठे - हे भाजपच्या बूथ कमिटीचे सदस्य आहेत. अटकेत असलेल्यांमध्ये आणखी अनेक जण भाजपचेच आहेत हे पुढे चौकशीत आणि खटल्यात स्पष्ट होईलच. त्यामुळेच धादांत खोटरड्या आरएसएस व भाजपची ही सर्व आदळआपट सुरू आहे. 
भाजपचे चमचे आणि रिपब्लिक टीव्ही चे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनी नुकतीच पालघर घटनेबद्दल सोनिया गांधींवर जी निर्लज्ज व निषेधार्ह मुक्ताफळे उधळली हा सुद्धा त्याच कटाचा भाग आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांचा अर्ज फेटाळून त्यांच्यावर खटला चालवण्याची अनुमती दिली आहे.पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज (पीयुसीएल) या सुप्रसिद्ध स्वतंत्र संघटनेने २३ एप्रिलला पालघरच्या घटनेबद्दल जो सविस्तर पाहणी अहवाल सादर केला आहे, त्यानेही संघ परिवाराचे बिंग फोडले आहे. आरएसएस, भाजप आणि संघ परिवाराचा हा गलिच्छ कट सर्व डाव्या, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष शक्तींनी उधळून लावलाच पाहिजे. आणि म्हणून पालघरचे हे सत्य आपण सर्वांनी सर्व माध्यमांतून - मुख्य मीडिया, तसेच व्हाट्सअप्प, फेसबुक, ट्विटर यांच्यातर्फे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलाच पाहिजे. 


डॉ. अशोक ढवळे
केंद्रीय कमिटी सदस्य, माकप
अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com