Trending

6/recent/ticker-posts

अर्थसंकल्पाला बसणार ठामपातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादाचा फटका

अर्थसंकल्पाला बसणार ठामपातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादाचा फटकाठाणे : 
ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या आठवडय़ात करण्यात आल्या होत्या. यामध्ये काही अधिकाऱ्यांना झुकते माप दिल्याची चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडी सूचनेनंतर बदल्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. यातूनच महापालिका प्रशासनातील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला असून त्यात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केलेल्या संदेशाची भर पडली आहे. या वादामुळेच अर्थसंकल्प लांबणीवर पडल्याची चर्चा ठाणे महापालिका वर्तुळात सुरू आहे.
फेब्रुवारी महिन्याचा चौथा आठवडा उजाडला तरी अर्थसंकल्प सादर होत नसल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे. त्याचा फटका शहरातील विकासकामांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे सादर करण्यात येतो. त्यामध्ये स्थायी समितीकडून काही बदल करून तो सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केला जातो. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवक चर्चा करून उत्पन्नवाढीसाठी काही उपाययोजना  सुचवितात. या सर्वाचा समावेश करून अखेर अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी दिली जाते. त्यानंतर अर्थसंकल्पाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाते. 
मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होऊ न त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम नागरी विकासकामांना होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर होण्यासाठी वेळीच कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना महिनाभरापूर्वी पत्रही दिले होते. मात्र फेब्रुवारी महिना संपत आला तरी अद्यापही प्रशासनाकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला नसून त्यामुळे यंदाही अर्थसंकल्प मार्च महिनाअखेर मंजूर होण्याची शक्यता धूसर आहे.


Post a Comment

0 Comments