नरिमन पॉईंट परिसरातील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) तर्फे तबला वादक, संगीतकार आणि जागतिक स्तरावर भारतीय संगीताची पताका उंचावणारे उस्ताद झाकिर हुसेन यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त ‘मेस्ट्रो फॉरएव्हर-ए ट्रिब्यूट टू झाकिर हुसेन’ ही दोन दिवसांची श्रद्धांजलीपर विशेष संगीत मैफील आयोजित करण्यात आली आहे. दिनांक १४ आणि १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत एनसीपीएमध्ये ही श्रद्धांजलीपर मैफील रंगणार आहे. एनसीपीएतर्फे आयोजित या संगीत मैफलीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे तीन ठिकाणी करण्यात येणार आहे. जेणेकरून अधिकाधिक मुंबईकरांना त्याचा आनंद घेता येईल. बोरिवली (पश्चिम) स्थित प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यगृह, दादर (पश्चिम) येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव, भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह या तीन ठिकाणी दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
तबला वादनातील मेरुमणी उस्ताद झाकिर हुसेन यांचे गत वर्षी दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. भारतीय व पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतापासून रॉक, पॉप, जॅझ, फ्यूजन आणि वर्ल्ड म्युझिकपर्यंत सर्व शैली आत्मसात असणारा त्यांचा दूरदृष्टिपूर्ण संगीतप्रवास आजही जगभरातील संगीतकारांसाठी प्रेरणादायी आहे. मुंबईचे सुपूत्र असलेले उस्ताद झाकिर हुसेन यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात भारतासह जगभरातील ५० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. या कलाकारांपैकी अनेकांनी झाकिर हुसेन यांच्यासोबत सांगितिक सादरीकरण केले असून, त्यांच्याशी वैयक्तिक, कलात्मक आणि भावनिक नाते जपले आहे. त्यामध्ये जॉन मॅक्लॉफ्लिन, लुईस बँक्स, डेव्ह लॅण्ड, गणेश राजगोपालन, रणजीत बारोट, व्ही. सेल्वगणेश, शंकर महादेवन, क्रिस पॉटर, संजय दिवेचा, गिनो बँक्स, अजय चक्रवर्ती, अमजद अली खान, राकेश चौरसिया यांसह अनेक प्रतिष्ठित संगीतकारांचा समावेश आहे.
‘मेस्ट्रो फॉरएव्हर’मध्ये प्रेक्षकांना विविध माध्यमांतून उस्ताद झाकिर हुसेन यांचा विलक्षण प्रवास अनुभवता येणार आहे. त्यात संगीत मैफिली, चर्चासत्रे व संवाद असेल. तसेच हुसेन यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांचे छायाचित्र प्रदर्शनही मांडण्यात येणार आहेत. सोबतच काही निवडक माहितीपटांचे विशेष प्रक्षेपणही केले जाणार आहे. झाकिर हुसेन यांच्या पत्नी अँटोनिया, मुली अनीसा व इसाबेला, तसेच बंधू देखील या कार्यक्रमात सहभागी होऊन या महान कलाकाराच्या स्मृतींना अभिवादन करतील. मुंबईच्या या सुपूत्राची स्मृती कायम रहावी, यासाठी ही श्रद्धांजलीपर संगीत मैफील अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी थेट प्रक्षेपण व्यवस्थेसह बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एनसीपीए’ला या श्रद्धांजलीपर विशेष संगीत मैफीलकरिता सहकार्य करीत आहे, असे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नमूद केले आहे.

0 टिप्पण्या