डोंबिवलीच्या पिसोली गावात एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला एका परप्रांतीय गुंडाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत संबंधित सोनाली कळासरे या तरुणीला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अविनाश जाधव यांच्या आदेशावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ झा याला शोधायला सुरुवात केली होती. ही शोधमोहीम सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांनी पोलिसांच्या आधी मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी गोकुळ झा याला शोधून काढले. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या परप्रांतीय गोकुळ झा याचा सगळा कच्चाचिठ्ठा उघड झाला आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोकुळ झा हा गायब झाला होता. कल्याण पोलिसांची पाच पथकं त्याचा शोध घेत होती. गोकुळ झा यांनी आपली ओळख लपवण्यासाठी त्याचा लूक बदलला होता. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी गोकुळ झा याने केस कापले होते. नेहमीसारखा पोशाख न करता टी-शर्ट परिधान केला होता. नांदिवली परिसरामध्ये गोकुळ झा अनेकांच्या ओळखीचा असल्यामुळे त्याने त्याचा लुक बदलला होता.
परंतु गोपाळ झा हा नांदिवली परिसरात फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो. त्यामुळे या भागात अनेकजण त्याला ओळखतात. त्यामुळे तो मंगळवारी रात्री नेवाळी परिसरात फिरत होता. त्यावेळी मनसेच्या योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री तो कल्याणमधील वसार गावातून शेतातून पळत जात असताना मनसैनिकांनी दिसला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून गाडीत टाकले आणि पोलीस स्टेशनमध्ये आणले. गोकुळ झा याला पोलिसांकडून आज न्यायालयात सादर केले असता त्याला दोन दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या नावावर कल्याण, कोळशेवाडी, उल्हासनगर या परिसरात दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून गोकुळ झा हप्ते वसुली करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी केला आहे.त्यामुळे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याची चौकशी करून त्याला कठोर शिक्षा कशी होईल, यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. गोकुळ झा हा चार दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. गोकुळवर याआधी दोन गुन्हे दाखल आहेत. हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे, असे २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा विठ्ठलवाडी आणि एक गुन्हा कोसळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका गुन्ह्यांत त्याने हत्याराने मारहाण केली होती तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याने ट्रक चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये सदरील ट्रक चालकाने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गोकुळला अटक झाली होती. चार दिवसांपूर्वीच गोकुळ हा जामिनावर सुटून बाहेर आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील मुख्य आरोपी गोकुळ झा सह त्याचा भाऊ रणजीत झाला अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले.

0 टिप्पण्या