महाराष्ट्रातील वारी परंपरा ही केवळ धार्मिक श्रद्धेची अभिव्यक्ती नाही, तर ती संत परंपरेतील समतेचा, बंधुतेचा आणि मानवतेचा सांस्कृतिक स्फोट आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखोबा, जनाबाई यांच्यापासून सुरू झालेल्या या चळवळीने हजारो वर्षांपासून जात, धर्म, लिंग यांच्या सीमारेषा पार करून भक्तिमार्गातून लोकशाहीचे आदिम बीज पेरले होते. आणि हीच लोकशाही २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या संविधानात मूर्त स्वरूपात अभिव्यक्त झाली. म्हणूनच, आज वारीत ‘संविधान समता दिंडी’सारखा उपक्रम राबवला जातो, तेव्हा तो आपल्या लोकपरंपरेचा पुरोगामी, समताधिष्ठित, आणि संविधाननिष्ठ आविष्कार ठरतो.मात्र, अलीकडे काही विघातक प्रवृत्ती या सामाजिक-संविधानिक संवादाला ‘अर्बन नक्षल’ ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. विधान परिषदेतील आमदार मनीला कायंदे यांचा विधानसभेत नुकताच झालेला विधान त्याचेच एक ताजे उदाहरण. ‘संविधान दिंडी’त अर्बन नक्षलवादी सहभागी होत आहेत, असा गंभीर आरोप करून त्यांनी एक सांस्कृतिक व संविधानिक चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
हा खरोखर कोणाचा अजेंडा आहे?
सांस्कृतिक कार्यक्रम, वारी, समाजजागर आणि संविधान यांचे नाते जोडणाऱ्या चळवळीला ‘अर्बन नक्षल’ ठरवण्यामागे काही हेतुपूरस्सर उद्दिष्ट आहेत. हे सर्व प्रकार बघितल्यावर स्पष्ट होते की, हे आरोप केवळ आणि केवळ भारतीय संविधानविरोधी मनुवादी विचार पसरवणाऱ्या शक्तींचा प्रचार आहे.अनेकदा या विचारसरणीच्या लोकांनी संघटनांनी संविधानिक मूल्यांवर घाव घालण्याचे काम केले आहेतो बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही, बंधुता आणि समता या तत्त्वांशी संपूर्णतः विरोधात आहे. त्यामुळेच जेव्हा कोणीतरी ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ किंवा ‘संविधान समता दिंडी’ सारखा उपक्रम राबवतो, तेव्हा त्यांना ‘अर्बन नक्षल’ असे लेबल लावून बदनाम करण्याचा घाट घातला जातो.
संत परंपरेतील समतेचे वारसदार कोण?
या संविधान दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या कीर्तनकार, वारीचे चोपदार, कैकाडी समाजातील संत, बौद्ध धम्माचार्य आणि विविध जातीधर्मांतील शेकडो कार्यकर्ते हे वारकरी परंपरेचे खरे वारस आहेत. त्यांनी कोणत्याही गटाचे राजकारण न करता समतेचा विचार पुढे नेण्यासाठी हे कार्य सुरू केले आहे. त्यामुळे, अशा उपक्रमांना ‘नक्षल’ ठरवणे म्हणजे केवळ संतांचे आणि संविधानाचे अपमान नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याचे विघटन करण्याचा प्रयत्न आहे.
अफवा, खोटे आरोप आणि नियोजित बदनामी
आज ‘अर्बन नक्षल’ ही एक राजकीय पेंढी झाली आहे. कोणालाही पुरावा न देता, कोणत्याही प्रश्नावर सामाजिक कार्यकर्त्यांना, विचारवंतांना आणि जनआंदोलनांना या नावाने हिणवले जाते. हे लोक राष्ट्रद्रोही ठरवले जातात आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. वास्तविक पाहता, वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही स्वरूपाचे हिंसक वा देशद्रोही विचार नाहीत. उलट, ते मानवतेचा आणि करुणेचा धर्म शिकवतात. त्यामुळे या उपक्रमांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न म्हणजे समाजात जातीय आणि सांस्कृतिक तेढ निर्माण करण्याची चाल आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या आरोपांचा गंभीरपणे पुनर्विचार करावा. जे लोक संविधान दिंडी आणि वारीचा अपमान करत आहेत, त्यांच्यावर तपास आणि कायदेशीर कारवाई व्हावी. संविधानाचे रक्षण करणाऱ्यांना अडथळे आणणाऱ्या शक्तींना अटकाव करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
संविधान आणि संतविचार यांचा सेतू तोडू नका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते संत परंपरेतील मूल्यांचे आधुनिक वाहक होते. ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’ हे उपक्रम सामाजिक समतेचा सेतू आहेत. हा सेतू जर खोट्या आरोपांनी, अफवांनी आणि सांस्कृतिक द्वेषाने तोडला गेला, तर त्याचे दुष्परिणाम समाजाच्या एकात्मतेवर होतील. त्यामुळे, हे एक धर्माधिष्ठित नव्हे तर लोकशाही मूल्याधिष्ठित कार्य आहे. यावर अतिरेकी संकल्पना लावून समाजात विष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे, ही आजची काळाची गरज आहे.
- डॉ. विजय मोरे
- 9029118010
0 टिप्पण्या