पर्यावरण संरक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भरपूर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी यंदाच्या वातावरणीय अर्थसंकल्पात भांडवली आणि महसुली खर्चात वाढ करण्यात आली आहे. यासोबतच, घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. तथापि, एकल वापराच्या प्लास्टिकला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांनीही स्वयंशिस्तीने कापडी किंवा कागदी पिशव्यांच्या वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी केले आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल - २०२५-२६’ आज ५ जून प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. भायखळास्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात आयोजित प्रकाशन सोहळ्यास उपायुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग) राजेश ताम्हाणे, प्रमुख अभियंता (पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग) अविनाश काटे, प्रमुख अभियंता (मलनि:सारण प्रचालन) प्रचिती देसाई, प्रादेशिक नागरी व पर्यावरण अभ्यास केंद्राचे (RCUES) संचालक डॉ. अजित साळवी आदी उपस्थित होते.
डॉ. अश्विनी जोशी पुढे म्हणाल्या, वातावरणीय अर्थसंकल्प २०२५-२६ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) यांच्याकडून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भांडवली खर्चासाठी १७,०६६.१२ कोटी आणि महसूली खर्चासाठी ३,२६८.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकल वापराच्या प्लास्टिकचा सर्वाधिक परिणाम बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहन करावा लागतो आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करताना नाल्यांतून गाळांपेक्षा कितीतरी जास्त प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत आहेत. प्लास्टिकचा वापर करू नये, यासाठी प्रशासनाकडून सक्ती आणि कारवाई सुरू आहे. तथापि, केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांनी नव्हे तर नागरिकांच्या स्वयंशिस्तीने प्लास्टिकवर निर्बंध येऊ शकते. त्यामुळे, नागरिकांनी सजगतेने कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी विविध प्रकल्पांच्या बांधकामाच्या ठिकाणी किंवा इमारतींभोवती विविध रंगसंगतीच्या ताडपत्रींचा वापर करायला हवा. हवामान बदलामुळे होत असलेल्या शहराच्या उष्णतावाढीसंदर्भातील उपाययोजनासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग प्रयत्नरत आहे. यासाठी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांनी विविध रंगसंगतीपूर्ण छत किंवा आच्छादनांशी संबंधित नवनवीन संकल्पना समोर आणाव्यात, असेही डॉ. जोशी म्हणाल्या.
मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये (MCAP) वातावरणविषयक ‘लक्ष्य’ निश्चित करण्यात आली आहेत. ही लक्ष्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वातावरणीय अर्थसंकल्प अहवालात समाविष्ट करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने २०२४-२५ पासून वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल प्रकाशित करण्यात येत आहे. यंदा या अर्थसंकल्प अहवालाचे दुसरे वर्ष आहे. वातावरणीय अर्थसंकल्प तयार करण्याबाबत जागतिक स्तरावर हाती घेण्यात आलेल्या सी-४० शहरे (C-40 Cities) या उपक्रमांचा मुंबईसुद्धा एक भाग आहे. यापूर्वी ऑस्लो, लंडन आणि न्यूयॉर्क या शहराशी संबंधित प्रशासनाकडून वातावरण अर्थसंकल्प अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अशाप्रकारचा अहवाल प्रकाशित करणारे मुंबई हे जागतिक स्तरावरील आता चौथे शहर बनले आहे.
वातावरणीय अर्थसंकल्पामध्ये मुंबई वातावरण कृती आराखड्याशी (MCAP) संबंधित ऊर्जा आणि इमारती, एकीकृत वाहतूक, शाश्वत कचरा व्यवस्थापन, नागरी हरित क्षेत्र आणि जैवविविधता, वायू गुणवत्ता, नागरी क्षेत्रातील पूर आणि जलसंपदा व्यवस्थापन या क्षेत्रांमधील प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी, धोरणे तसेच मार्गदर्शक तत्वांमध्ये वातावरणस्नेही उपाययोजनांचा अवलंब करणे या बाबींचा समावेश आहे. २०२५-२६ या वर्षीय वातावरणीय अर्थसंकल्पामध्ये बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट); अनुकूलन आणि स्थिती स्थापकता निर्देशांक; निरीक्षण, मूल्यांकन आणि अहवाल (MER) प्रणालीचा प्रायोगिक वापर; बाह्य वित्तीय स्त्रोत या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
• वातावरणीय अर्थसंकल्प २०२५-२६ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भांडवली खर्चासाठी १७,०६६.१२ कोटी आणि महसूली खर्चासाठी ३,२६८.९७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
• बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण ४३,१६२.२३ कोटी रुपयांच्या भांडवली अर्थसंकल्पीय अंदाजापैकी १६,३२१.३३ कोटी रुपयांची (३७.८१ टक्के) तरतूद ही वातावरण अनुकूल बाबींशी संलग्नित आहे. २०२४-२५ च्या तुलनेत यंदा ही तरतूद वाढवून ५९.६४ टक्के करण्यात आली आहे. गतवर्षी एकूण ३१,७७४.६४ कोटी रुपयांच्या भांडवली अर्थसंकल्पीय अंदाजात १०,२२४.२४ कोटी रुपयांची तरतूद (३२.१८ टक्के) वातावरण अनुकूल बाबींशी संलग्नित होती. सात नवीन विभागांच्या वातावरण-अनुकूल खर्चांचा समावेश, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचा वाढलेला अर्थसंकल्प आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २० मूळ विभागांच्या नवीन उपक्रमांमुळे ही वाढ झाली आहे.
• आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महसुली अर्थसंकल्पात वातावरण अनुकूलतेच्या अनुषंगाने ५.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नियोजन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वातावरण अनुकूल उपक्रमांचा समावेश आहे.
• मुंबई वातावरण कृती आराखड्याशी (MCAP) संबंधित इतर भांडवली कामांसाठी (उदा., बांधकामविषयक मोठ्या प्रकल्पांमध्ये समाविष्ट पर्जन्य जलसंचयन, मलनिसारण प्रक्रिया इत्यादींसारखे घटक आदींसाठी) २०२४-२५ मध्ये २,१६३.८ कोटी रुपयांची म्हणजेच ६.८१ टक्के इतकी तरतूद करण्यात आली होती. ती २०२५-२६ मध्ये ३,०७४.०८ कोटी रुपये म्हणजेच ७.१२ टक्के इतकी करण्यात आली आहे.
• आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने (बेस्ट) एकूण १,८४९.२४ कोटी रुपये भांडवली खर्चापैकी ४० टक्के म्हणजे ७४४.८ कोटी रुपयांची वातावरण-अनुकूल उपक्रमांसाठी तरतूद केली आहे. तसेच, ७,५४४.३९ कोटी रुपये महसूली खर्चापैकी ४३.२५ टक्के म्हणजे ३,२६३.२४ कोटी रुपयांची तरतूद ही वातावरण-अनुकूल बाबींशी संलग्नित आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG) यांचे प्रादेशिक नागरी व पर्यावरण अभ्यास केंद्र (RCUES) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘प्रथम ग्रह: प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’ (Planet First: Ending Plastic Pollution) या विषयावर वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात सहभागी तज्ञांनी प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली.
0 टिप्पण्या