पवई तलाव प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढून त्याला नैसर्गिक समृद्धी प्रदान करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेषत्वाने, तलावातील जलपर्णी हटवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीला वेग देण्याकामी तात्काळ ५ संयंत्रे आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करावा, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्न अंतर्गत, तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याचे काम दिनांक २३ मे २०२५ पासून अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणजे दिनांक २३ मे २०२५ ते दिनांक १ जून २०२५ या दहा दिवसांच्या कालावधीत १ हजार ४५० मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जलपर्णी काढताना नैसर्गिक घटकांचे संरक्षण व संवर्धन करण्याची खबरदारी देखील घेतली असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पवई तलाव हा सन १८९१ मध्ये निर्माण करण्यात आला असून त्याचा संपूर्ण जलव्याप्त परिसर २२३ हेक्टर इतका आहे. जवळपास ६.६ किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६०० हेक्टर पर्यंत पसरलेले आहे. तलावाची जलधारणा क्षमता ही सुमारे ५ हजार ४५५ दशलक्ष लीटर इतकी आहे. पवई तलावाचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त (non-potable) इतर प्रयोजनासाठी उपयोगात येते. पवई तलाव परिसरात वाढलेले नागरिकरण आणि तलावामध्ये येणारे सांडपाणी इत्यादी कारणांनी तलावामध्ये जलपर्णी, इतर अनावश्यक वनस्पतींची वाढ झाली आहे. जलपर्णींची अनावश्यक वाढ झाल्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकून जातो आणि पाण्याची गुणवत्ता तसेच जैवविविधता यावर प्रतिकूल परिणाम होतो. एवढेच नव्हे तर सूर्यप्रकाशाचे पाण्यातील परावर्तन कमी होऊन तलावातील माशांचे खाद्य असणाऱया वनस्पतींची वाढ खुंटते आणि अन्नसाखळीत अडथळा निर्माण होतो. पाण्याची गुणवत्ता देखील खालावते. या सर्व बाबी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पवई तलाव आणि परिसरात जैवविविधता संरक्षणाची जी विविध कामे सुरू केली आहेत, त्यामध्ये तलावातील जलपर्णी काढणे आणि मुंबई महानगराबाहेर त्याची विल्हेवाट लावणे, ही एक महत्त्वाची कार्यवाही सुरू असल्याचेही महापालिकेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पवई तलावातून गत सहा महिन्यांत २ संयंत्राद्वारे सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. तथापि, जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. ज्या गतीने जलपर्णी काढली जात आहे, त्यापेक्षा कित्येक पट अधिक गतीने जलपर्णी वाढत आहे. एकूणच, जलपर्णीच्या आच्छादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पवई तलावात सांडपाणी, मलजल मिसळत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणावर फोफावते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती अधिक वाढवावी, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार, जलपर्णी काढण्याची कार्यवाही अधिक प्रभावी होण्याकामी ५ संयंत्रांद्वारे काम अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. हार्वेस्टर मशीन, पंटून माउंटेड पोकलेन आणि पोकलेन, डंपर या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही कामे सुरू आहेत. त्यासाठी दोन सत्रांमध्ये (Shift) अधिकचे मनुष्यबळ वापरले जात आहे. पावसाळ्यानंतर ६ संयंत्रे तैनात करण्यात येणार आहेत. जलपर्णीची मुंबई महानगराबाहेरील क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावण्यात येत आहे. तलावातील जलपर्णी काढताना जैव विविधतेस कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' या संस्थेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली जात आहे.
दरम्यान, पवई तलावातील सांडपाण्याचा निचरा करण्याकरिता महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) खात्यामार्फत २ निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यात मलनिस्सा:रण वाहिनी अंथरणे आणि ८ दशलक्ष लीटर (MLD) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे या दोन कामांचा समावेश आहे. पवई तलावात १८ दशलक्ष लीटर सांडपाण्याचा प्रवाह येतो. त्यापैकी ८ दशलक्ष लीटर सांडपाणी हे सध्या बंद असलेल्या पवई उदंचन केंद्राच्या जागेवर प्रस्तावित आहे. ८ दशलक्ष लीटर सांडपाणी हे प्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करुन ते पुन्हा तलावात टाकण्यात येईल. तसेच, उर्वरित ८ दशलक्ष सांडपाणी हे आदि शंकराचार्य मार्गावरील अस्तित्वात असलेल्या मलनिस्सा:रण वाहिनीद्वारे भांडुप येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळते करण्यात येणार आहे. उर्वरित २ दशलक्ष सांडपाणी हे पेरु बाग येथील उदंचन केंद्राकडे वळवून मलनिस्सारण वाहिनीद्वारे मिठी नदीवरील ९ दशलक्ष लीटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळते करण्यात येणार आहे. यामुळे, पवई तलावात येणा-या सांडपाण्याच्या प्रवेशाला अटकाव करुन वळवणे याकरिता मदत होणार आहे. या कामाची निविदा कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तर, पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे या कामाचे मसुदापत्र (D.L.) मंजूर करण्यात आले आहे. या निविदेची स्वीकृती (Date of Acceptance) येत्या आठवड्यात होऊन कार्यादेश देणे अपेक्षित असल्याचे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
0 टिप्पण्या