Top Post Ad

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक साहित्य

  • *मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार शैक्षणिक साहित्य*
  • *• बालवाडीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थांना मिळणार दफ्तर, गणवेश, कंपाससह सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य*
  • *• इयत्ता आठवी ते दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता अभ्यासासाठी शाळेत टॅबही उपलब्ध*
  • *• मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचे नियोजन*    

मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱया बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच दिनांक १६ जून २०२५ रोजी सर्व  प्रकारचे शालोपयोगी शैक्षणिक साहित्य मोफत वितरित करण्यात येणार आहे. या साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दफ्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. यासह इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टॅबही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक साहित्य मोफत वितरित करण्याचा उपक्रम राबवित आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा एप्रिल महिन्यातच महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शालेय साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांच्या देखरेखीखाली प्रत्येक शाळेत दिनांक १६ जून २०२५ रोजी विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित केले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची स्थापना सन १९०७ मध्ये करण्यात आली. सध्या महानगरपालिका शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी शालेय साहित्य मोफत दिले जाते. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा आणि शिक्षणाबाबत गोडी लागते. तसेच संपूर्ण वर्षभरातील अभ्यासाचेही नियोजन विद्यार्थ्यांना करता येते. 

मोफत वाटप करण्यात येणाऱया साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दफ्तर, बूट, सॅण्डल मोजे आदींचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेतील बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱया साडेतीन लाख विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार आहे. सर्व शाळांमध्ये हे साहित्य पोहोचविण्यात येत आहे. शाळानिहाय वाटपाचे नियोजनही पूर्ण झाले आहे. या साहित्यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होत असतो. तसेच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तके राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत.

इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीच्या अभ्यासासह आधुनिक पद्धतीचाही सराव व्हावा, तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शालेय वेळेत टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या टॅबमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. टॅब कसा हाताळावा, त्याचा अभ्यासात उपयोग कसा करावा, याबाबत शिक्षकही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. दिनांक १६ जून २०२५ रोजी जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील, त्यांना त्याच दिवशी हे साहित्य मिळेल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही ते ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील त्या दिवशी हे शैक्षणिक साहित्य देण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com