मुंबईतील जमिनी लुटण्याचा भस्म्या रोग अदानीला जडला असून संपूर्ण मुंबई त्यांना गिळायची आहे आणि त्यासाठी भाजपा सरकार स्थानिकांचा विरोध डावलून अदानीला जमिनी देत सुटले आहे. कुर्ला मदर डेअरीची जमीन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असताना केवळ अदानीच्या आग्रहाखातर ती हस्तांतरित करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला जनतेचा तीव्र विरोध असतानाही या सरेंडर सरकारने कॅबिनेटमध्ये ती जमीन अदानीला बहाल केली. हे सरेंडर सरकार असून डोनाल्ड ट्रम्पचा फोन आला की नरेंदर सरेंडर होतात आणि मोदींचा अदानीसाठी फोन येताच देवेंदर सरेंडर होतात, असा घणाघाती हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमीन लुटीविरोधात कुर्ल्यात लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले. शांततेने आंदोलन करत असताना पुन्हा एकदा सरकारने लोकांचा आवाज दडपण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा पाठवला होता व पोलीस बळाच्या जोरावर शांततापूर्ण आंदोलन रोखले हा कुठला न्याय? मोदानी अँड कंपनी लोकांचे हक्क हिरावून घेत आहे, मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकावल्या जात आहेत, अन्याय केला जात आहे आणि सरकार मात्र चोरांना सुरक्षा देत आहे व जनतेचा आवाज दडपत आहे. . लाखो धारावीकरांना उद्ध्वस्त करून धारावीतील ६०० एकर जमिनीचा कब्जा मिळवण्याचे षडयंत्र रचले, नंतर या प्रकल्पाचा आडून कुर्ला मदर डेअरी, मिठागरांच्या जमिनी, देवनार, मढ-आक्सा येथील मुंबईकरांच्या हक्काच्या ५४१ एकर जमीन फुकटात मिळवल्या आहेत. आणि एअर इंडिया कॉलनी, बांद्रा रिक्लेमेशन, बेहरामपाडा, मोतीलाल नगर येथील शासकीय जमिनी स्थानिकांना विश्वासात न घेता काबीज करण्याचा कट रचला आहे. कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर शेकडो वर्षाचे जुने मोठे हजारो वृक्ष आहेत. या जागेवर बोटॅनिकल उद्यान करावे अशी स्थानिकांची मागणी आहे. या जागेचे बाजारमूल्य शेकडो कोटी रुपये आहे पण अदानीच्या फायद्यासाठी ही जमीन नाममात्र दराने हस्तांतरित करण्यात आली असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीजींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का देत आहेत? राहुल गांधीजींनी ठोस तथ्यांसह प्रश्न विचारले आहेत. मतदानाच्या शेवटच्या काही तासांत मतदान इतके कसे वाढले? याचे उत्तर अद्याप निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही. पण फडणवीस उत्तरे देत आहेत ते काय निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल विचारत विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला आहे, त्याची उत्तरे निवडणूक आयोगाला द्यावीच लागतील. हा लोकशाही व संविधान रक्षणाचा प्रश्न आहे असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
. या आंदोलनात आमदार ज्योती गायकवाड, सुभाष भालेराव, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, मुंबई महासचिव महेंद्र मुणगेकर, संदीप शुक्ला, अवनीश सिंग, कचरू यादव, नगरसेवक अशरफ आझमी, वंदना साबळे, अजंता यादव, इंदूप्रकाश तिवारी, राजेश इंगळे आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या