धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजपा युती सरकार मुंबईतील विविध ठिकाणच्या मोक्याची जमिनी अदानीला भेट देत सुटले आहे. मिठागरे, देवनर डंपिग ग्राऊंडची जमीन दिल्यानंतर कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जमीनही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला धारावीकरांचा विरोध असून धारावीकरांच्या मुळावर उठलेल्या भाजपा सरकार विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने रविवार ८ जून रोजी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे
कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेवर बोटॅनिकल गार्डन करावी ही स्थानिकांची मागणी आहे. या जागेत मोठ मोठे हजारो वृक्ष आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची जागा आहे. ही जागा अदानीच्या घशात घालण्यापासून वाचवण्यासाठी अनेक आंदोलने केली पण सरकार मात्र जनतेकडे दुर्लक्ष करून अदानीसाठी काम करत आहे. अभ्युदय बँक ते कुर्ला मदर डेअरी, नेहरू नगर, कुर्ला (पूर्व) येथे हे आंदोलन केले जाणार आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, सर्व आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनात मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाजपा महायुती सरकारच्या या निर्णयाला विरोध करावा असे आवाहन मुंबई काँग्रेसने केले असल्याचे सुरेशचंद्र राजहंस सांगितले.
0 टिप्पण्या