अहमदाबाद विमान दुर्घटनेत गेल्या दोन दिवसांत मृतांचा आकडा २७५ पर्यंत पोहोचला आहे. अपघातानंतर विमानाच्या शेपटीकडील भागात आज १४ जून रोजी आणखी एक मृतदेह सापडला आहे. कोळसा झालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. डिएनए टेस्ट करुन मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मृतांचे नातेवाईक प्रचंड मोठ्या मानसिक दबावाखाली आहेत. अशावेळी त्यांच्या प्रतिक्रीया कॅमेऱ्यावर घेणे सुरु आहे. वास्तविक, अपघातग्रस्त झालेले बोईंग एआय-१७१ (ड्रिमलायनर) विमानाचे लंडनसाठीचे उड्डाण दिनांक १ मे २०२५ रोजी तांत्रिक त्रुटींमुळे रद्द करण्यात आले होते. जनरेटर नीट चालत नसल्याचे कारण देण्यात आले होते. विमानात बसलेल्या प्रवाशांना उतरुन त्यांची एका दिवसाची सोय पंचतारांकीत हॉटेल मध्ये करण्यात आली होती.दुसऱ्या दिवशी दोन तासांच्या रखडपट्टीनंतर हेच विमान लंडनसाठी गेले. पत्रकार व फोटोग्राफर राहीलेले लंडनस्थित भारतीय शरदचंद्र रावल यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. तशी बातमी देखील गुजरात समाचार मध्ये प्रसिध्द झाली होती.
आकाश वस्त्य या प्रवाशाने अपघाताच्या दिवशी याच विमानातून दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला होता. या विमानातील टिव्ही, एसी वगैरे चालत नसल्याचे व्हिडीओ त्याने चित्रित करुन X वर पोस्ट केले आहेत.
या दोन्ही घटनांचा विचार करता विमान सुस्थितीत नव्हते. हाच निष्कर्ष निघतो. एसी, टिव्ही न चालणे व विमान अपघात याचा संबंध नसतो. मात्र यावरुन विमानांची देखभाल दुरुस्ती योग्य पध्दतीने होत नव्हती हे समजते. याबाबत रविश कुमार वगळता कोणीही बोलत नाही. संसदेच्या स्थायी समितीने मार्च २०२५ मध्ये सरकारला एक अहवाल दिला आहे. या अहवालानुसार, DGCA (डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) मध्ये ५३ टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. DGCA भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे नियमन आणि देखरेख करणारी प्रमुख संस्था आहे. विमानांची तांत्रिक सुरक्षा तपासणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना सुचवणे हे DGCA चे काम आहे. जर ५३ टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असतील तर DGCA काम कशी करत असेल हे लक्षात येतेय. इथे सरकारचा लंगडेपणा स्पष्ट दिसत आहे.विमान अपघातानंतर DGCA ने एअर इंडियाला १३ जून २०२५ रोजी पत्र दिले असून त्या पत्रात, एअर इंडियाच्या बोइंग ७८७-८ आणि ७८७-९ विमानांच्या संपूर्ण ताफ्यावर विशेष सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजे अपघाताच्या आधी अशाप्रकारे विशेष सुरक्षा तपासणी एअर इंडिया करत नव्हती हे स्पष्ट आहे. संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालानुसार AAI (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) मध्ये १७ टक्के एकूण ३,२०० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. तर BCAS (ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटी) मध्ये ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.
अपुरे मनुष्यबळ सुरक्षा मानकांच्याप्रमाणे प्रभावीपणे कार्यक्षम राहु शकत नाही हे कोणालाही समजते. सरकारचे हे वागणं प्रवाशांच्या जीविताशी खेळ नाही का? यावर चर्चा करायची नाही म्हणून गोदी मेडीयाने वार्तांकन कशाचे सुरु केलेय, तर भगवदगीतेचे पुस्तक स्फोटातून वाचले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या १२०६ या लकी नंबर बाबतची अंधश्रद्धा चघळली जातीये, या अपघातातून जो एकमेव प्रवासी सुदैवाने वाचला त्याच्या सीटचा नंबर ११ आहे. तो ११ नंबर या प्रवाशाचा लकी नंबर असल्याचा जावईशोध लावला गेला आहे. अमक्या ढमक्या ज्योतिषाची पोस्ट, पुस्तकाचे फोटो दाखवले जात आहेत. विमानात पोहोचण्यास उशीर झाल्याने प्रवास न करु शकलेली महिला मला गणपतीने वाचवले म्हणते. तेच वाक्य चघळले जात आहे. भारतीय गोदी मेडीयाने असंवेदनशील वार्तांकनाचा जो किसळवाणा प्रकार सुरु केला आहे तो नीचपणा आहे. मृतकांबाबत व त्यांच्या नातेवाईकांच्या अवस्थेबाबत कोणालाही काही पडलेली नाही. याआडून अनेक महत्वाच्या गोष्टी लोकांपासून लपवल्या जात आहेत.
- तुषार गायकवाड
----------------------------------------
0 टिप्पण्या