महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व माजी मुख्य माहिती आयुक्त मा. रत्नाकर गायकवाड.... त्यांच्याविषयी समाजात नाना प्रकारचे गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत. त्यांना अपमानित करण्याची, बदनाम करण्याची मोहीम काही विशिष्ट लोकांकडून सातत्याने अद्यापही राबविण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर शारीरिक हल्ला करून त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण सुद्धा करण्यात आली होती. मात्र त्यांनी मोठ्या मनाने हल्लेखोरास माफ केले व पोलिसांनी स्वत:हून नोंदविलेला FIR मागे घ्यावयास लावला. नुकतेच त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहराजवळ १२ एकर जागेत एक नितांत सुंदर धम्म मॉनेस्ट्री प्रकल्प उभा केला आहे. भविष्यात आणखी जागा मिळवून अंदाजे १०० एकर जागेत हां प्रकल्प विस्तारण्यात येणार आहे. याबद्दल पुढे कधीतरी लिहिता येईल. मात्र त्यांच्याबद्दल पसरविण्यात आलेले गैरसमज खरेच वस्तुस्थितीवर आधारीत आहेत काय ? किंवा निव्वळ द्वेषापोटी, ऐकीव माहितीवर आधारित पूर्वग्रहापोटी त्यांच्याबाबतीत बदनामीची मोहीम राबविली जाते यांची शहानिशा करणे आवश्यक आहे. त्यांच्यावरील आरोपात खरोखरच तथ्य असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलीच पाहिजे. अन्यथा वारंवार या विषयाला उगाळत बसू नये असे माझे मत आहे.
रत्नाकर गायकवाड यांच्यावर असा आरोप केला जातो की, ते स्वत: आयएएस अधिकारी झाले, राज्याचे मुख्य सचिव झाले मात्र त्यांनी समाजासाठी काहीही केले नाही. यासंदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी कोणाच्या वैय्यक्तिक हितांची जसे की बदली, बढती,नियुक्ती DE या स्वरूपाची मेरिट नसलेली कामे केली नाहीत हे खरे आहे. मात्र त्यांनी व्यापक सामाजिक हिताची कामे निश्चितच केली आहेत. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर गडचिरोलीचे प्रथम जिल्हाधिकारी म्हणून ते १९८२ मध्ये या जिल्ह्यात रुजू झाले. या जिल्ह्याचे मुख्यालय बांधण्यापासून ते प्रशासनाची घडी नीट बसविण्यापर्यंत संपूर्ण कामे त्यांनी केली. मी नोव्हेंबर १९८३ मध्ये कुरखेडा येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून नोकरीस लागलो. मी स्वत: अनुभवले आहे की, या काळात गडचिरोली जिल्ह्यात काम करायला कर्मचारी मिळत नव्हते. रत्नाकर गायकवाड यांनी यासाठी मोहीम राबवून तेथील बौद्ध कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन नोकरीसाठी उमेदवार सुचविण्याचे आवाहन केले. त्यांनी सुचविलेल्या शेकडो लोकाना विविध विभगात वर्ग ३ च्या नोकऱ्या दिल्या.यामध्ये अनुसूचित जाती जमाती व ओबीसी लोक मोठ्या संख्येत नोकरीस लागले. माझे कितीतरी नातेवाईक क्लार्क म्हणून लागले आणि पुढे, कार्यालय अधिक्षक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार म्हणून निवृत्त झाले. हे लोक अजूनही रत्नाकर गायकवाड यांन देवासमान मानतात.समाजकल्याण संचालक म्हणून काम करताना त्यांचे महत्वपूर्ण योगदान म्हणजे अनुसूचित जातीसाठी ६०० वस्तीगृहाचा बृहत आरखडा मंजूर करून घेणे. व दरवर्षी किमान ५० वस्तीगृहे सुरू करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे हे आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एकाच वर्षी ३२ वसतिगृहे सुरू केली हां एक विक्रमच म्हणावा लागेल. आयाज महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या शासकीय वसतिगृहाचे जे जाळे पसरलेले दिसते त्याचे मुख्य शिल्पकार रत्नाकर गायकवाड आहेत. पुढे ते मुख्य सचिव झाल्यानंतर त्यांनी अनुसूचित जातींच्या शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याचा निर्णय घेतला व त्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी केलेले हे काम अतुलनीय आहे. त्यांच्या समाजकल्याण संचालक पदाच्या कार्यकाळात त्यांनी बार्टी BARTI या संस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले व यशस्वी केले. बार्टी या संस्थेची नवीन इमारत बांधणीसाठी त्यांनी आराखडा तयार केला व पुढे समाज कल्याण सचिव झाल्यावर त्यांनी ही इमारत बांधून पूर्ण केली. बार्टी या संस्थेचे जे महत्व वाढले आहे त्याचा पाया रत्नाकर गायकवाड यांनी घातला आहे.
समाजकल्याण सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनुसूचित जातींसाठी अत्यंत महत्वाची अशी वैमानिक प्रशिक्षण योजना महात्मा फुले विकास मंडळातर्फे सुरू केली, यातून अनुसूचित जातींचे अनेक पायलट तयार झाले. अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र आश्रमशाळांना मंजूरी देण्याचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात त्यांनी मंजूर करून घेतला. अनुसूचित जातींच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा पाया त्यांनी घातला. या योजनेच्या संदर्भातील पहिली बैठक सन १९९६ मध्ये सामाजिक न्याय खात्याचे सचिव म्हणून त्यांनी बोलाविली होती. या बैठकीस मंत्रालय मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मा. मधुकर एम. कांबळे व संघटनेचे अनेक पदाधिकारी हजर होते. त्यामध्ये मी सुद्धा होतो. या योजनेचा प्रारंभिक आराखडा त्यांनी तयार केला होता. मात्र पुढे त्यांची बदली झाल्याने ती योजना त्यांच्या कार्यकाळात पूर्ण होऊ शकली नाही. परंतु पुढे मा.सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर २००३ साली ही योजना सुरू झाली व आजमितीस शेकडो विद्यार्थ्यानी त्याचा लाभ घेतला आहे. अजूनही घेत आहेत. मात्र या योजनेची मूळ संकल्पना रत्नाकर गायकवाड यांची आहे याची कोणालाही आठवण नाही.
खैरलांजीमध्ये जेव्हा भोंतमंगे कुटुंबियाचे निर्घृण हत्याकांड घडले त्यावेळी POA ऍक्ट अंतर्गत नोडल ऑफिसर म्हणून, रत्नाकर गायकवाड ( तत्कालीन महासंचालक YASHADA ) कार्यरत होते. त्यांनीही वैयक्तिकरित्या खैरलांजी गावाला भेट दिली. प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देणारे ते पहिले बौद्ध आयएएस अधिकारी होते. रत्नाकर गायकवाड व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी या घटनेच्या संदर्भात माहिती घेऊन एक अहवाल तयार केला. यात अनेक महत्वपूर्ण बाबि नमूद करण्यात आल्या होत्या व संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. हा अहवाल सरकारला सादर करण्याच्या आधीच यशदा वेबसाईटवर अपलोड करण्यात आला होता.
हा अहवाल यशदाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्यामुळे पोलीस दलाची व सरकारची नाचक्की झाली आहे असा मुद्दा उपस्थित करून तत्कालीन महासंचालक नागरी हक्क संरक्षण कक्ष, श्री राज खिलनानी तत्कालीन पोलीस महासंचालक यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीने बैठक बोलावून रत्नाकर गायकवाड याना प्रत्यक्ष हजर राहण्याच्या सूचना दिल्या. यासंदर्भातील पत्र गृह विभागाकडून पाठविण्यात आले होते. हे पत्र मी स्वत: ड्रॉफ्ट केले व त्यावर गृह विभागाचे तत्कालीन अप्पर मुख्य सचिव श्री मुखोपाध्याय यांची सही घेऊन फॅक्सने रत्नाकर गायकवाड याना पाठविले. ( त्यावेळी मी गृह विभागात मागासवर्गीय अत्याचार प्रतिबंध कक्षाचा कक्ष अधिकारी होतो.) यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत रत्नाकर गायकवाड याना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गृहमंत्री आर.आर. उर्फ आबा पाटील यांनी प्रचंड अपमानित केले. त्यांनी आपला अहवाल यशदाच्या वेबसाइटवरून तात्काळ काढावा,सरकारकडे लेखी माफी मागावी तसेच पोलीस महासंचालक यांचीही माफी मागावी असे त्यांना बजावण्यात आले. रत्नाकर गायकवाड यांनी यावेळी आपण कोणतीही चूक केली नसल्याचे बैठकीत सांगितले. मात्र अहवालातून मृत व्यक्तीची मरणानंतरही विटंबना चालू ठेवणे उचित नाही या सबबीखाली अहवालातून मृतदेहाचे फोटो काढून टाकण्यास तयारी दर्शविली. मात्र सरकारने संपूर्ण अहवालच यशदाच्या वेबसाइटवरून हटविण्यास सांगितले. रत्नाकर गायकवाड यांनी आपण आपले कायदेशीर कर्तव्य बजावल्याचे सांगून अहवालाबाबत सरकारची व पोलीस महासंचालकांची लेखी माफी मागण्यास नकार दिला. यानंतर नोडल अधिकारी म्हणून त्यांच्यावर देण्यात आलेली जबाबदारी सरकारने काढून टाकली.
त्यांची नियुक्ती झालेल्या बहुतेक ठिकाणी त्यांनी स्थानिक लोकाना सहकार्य करून बुद्ध विहारे ई. बांधण्यास हातभार लावला आहे. सोलापूर येथील भव्य बुद्ध विहाराचे बांधकाम त्यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाले.देहूरोड येथील बुद्ध विहाराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, काही हितशत्रुनी त्यात खोडा घातला त्यामुळे अजूनही हे काम पूर्णवस्थेत येऊ शकलेले नाही.मुंबईतील नाहूर स्टेशनच्या बाजूला राजगृह बुद्धविहाराची चार मजली इमारत उभी आहे. या इमारतीसाठी रत्नाकर गायकवाड साहेबांनी जागा उपलब्ध करुन दिली व बांधकामासाठी सर्व प्रकारचे सहाय्य केले. गोराई येथील जगप्रसिद्ध विपश्यना पॅगोडा बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून घेणे, रस्ता बांधणे, विविध प्रकारच्या शासकीय मंजूरी मिळवणे, निधी संकलन करणे इत्यादि स्वरूपात त्यांचा जवळपास ८० टक्के वाटा आहे.
रत्नाकर गायकवाड यांना आंबेडकर भवन पाडण्यास जबाबदार धरून त्यांना प्रचंड बदनाम करण्यात आले. त्यांच्यावर शारीरिक हल्लासुद्धा करण्यात आला. मात्र या प्रकरणाची सत्य आणि कायदेशीर वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. (ज्याना सत्य आणि कायदेशीर वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल त्यांना संपूर्ण वस्तुस्थितीची माहिती देणारा PDF दस्तावेज पुरविण्यात येईल.) वास्तविकत: त्यावेळी लोकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेऊन भावनिक उद्रेक केला नसता तर आज पूर्णतः समाजाच्या मालकीची आंबेडकर भवनाची १७ मजली भव्य वास्तु उभी राहिली असती. ही वास्तू उभी राहावी यासाठी BARTI या संस्थेला इमारतीतील दोन मजले ३० वर्षाच्या लिजवर देऊन त्यांच्याकडून जवळपास ७० कोटी रुपये घेण्याचे तत्वत: मान्य करण्यात आले होते. शासनाने १० कोटी रुपये मंजूर केले होते. निधीची ही जमवाजमव रत्नाकर गायकवाड यांच्या प्रयत्नातुन झाली होती. मात्र काही काही हितशत्रुनी चुकीची, धादांत खोटी माहिती पसरवून यात रत्नाकर गायकवाड यांना जाणीवपूर्वक बदनाम करून पूर्णतः समाजाच्या मालकीची इमारत बांधण्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.
मा. रत्नाकर गायकवाड बदनामीचे असंख्य वार झेलत आज वयाच्या ७२ व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने समाजकार्यात आणि धम्मकार्यात मग्न आहेत. त्यांना बळ मिळो आणि उत्तम दीर्घायुरारोग्य लाभो हीच सदिच्छा !!
0 टिप्पण्या