चिपळूण: गेली तीन वर्षे कार्यरत असलेली यशोधरा महिला मंडळ,खेरशेत या स्थानिक/मुंबई महिला संघटनेच्या पुढाकाराने याही वर्षी भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगप्रवर्तक महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव खेरशेत,ता.चिपळूण मुक्कामी भव्य दिव्य स्वरूपात उपरोक्त महिला मंडळांच्या अध्यक्षा शैला बालाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली तर अँड. स्मिता कदम आणि युवा छात्र समरीन जमालुद्दीन कादिरी या मार्गदर्शक व्याख्यात्याच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या जयंती महोत्सवा मध्ये पहिला दिवस महिला मंडळाकडून तर दुसरा दिवस स्थानिक/मुंबई संघटनेकडून साजरा होत असतो.या जयंती महोत्सवा निमित्त सकाळी पंचशील, पक्ष ध्वजाचे ध्वजारोहण महिला अध्यक्षा शैला बालाजी कदम यांच्या समवेत चिपळूण कोर्टाच्या सरकारी वकील अँड. स्मिता कदम व डी.बी.जे कॉलेजच्या युवाछात्रा समरीन जमालुद्दीन कादिरी यांच्या हस्ते करण्यात आला. सामूहिक बुद्ध पूजापाठानंतर प्रमुख महिला पाहुण्यांसमवेत कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवाछात्रा समरीन जमालुद्दीन कादिरी यांनी महिला तसेच उपस्थित पुरुष वर्गाला संबोधिताना प्रथम संस्कृत भाषेतला श्लोक सादर करून पुढे त्या म्हणाल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एका मुस्लिम महिलेला बुद्ध जयंतीच्या निमित्ताने विचारपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या लिखित संविधानाद्वारे दिल्या गेलेल्या मूलभूत अधिकारांमुळे ऋण व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली. या भावनोदगारांनी उपस्थितांची मने गहिवरून आली. प्रचंड टाळांच्या, जयघोषानी त्यांचे स्वागत करण्यात आले. पुढे अँड. स्मिता कदम यांनी अन्न ,वस्त्र ,निवारा या मूलभूत गरजांपैकी आजच्या युगात शिक्षण,करियर आणि संविधान साक्षरता हे प्रत्येक समाज घटकांच्या मूलभूत गरजा आहेत. या फक्त व फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्हां महिलांना प्राप्त झालेल्या आहेत. यावेळी विशेष लक्षणीय उपस्थिती हजरत मौलाना जमालुद्दीन कादिरी.(इमाम कादिमी जामा मस्जिद, कालुस्ते) यांची होती.
दुसऱ्या दिवशी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती,गावशाखा: खेरशेत, धम्मभूषण विकास संघ, खेरशेत, मुंबई (रजि.) सम्यक युवा मंच, खेरशेत या संस्थेच्या वतीने युगप्रवर्तक महापुरुषांचा जयंती महोत्सव स्थानिक संस्थेचे अध्यक्ष सुनील कदम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुंबई संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, सम्यक युवा मंचचे संस्थापक अँड. प्रशितोष कदम, सावर्डे विभागाचे अध्यक्ष काशीराम कदम गुरुजी, सावर्डे मुंबई विभागाचे अध्यक्ष शरद कदम, महिला मंडळांच्या अध्यक्ष शैला बालाजी कदम आणि मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. चिपळूणच्या जनजागृती संस्थेचे अध्यक्ष, बौद्धाचार्य व ज्ञानदीप लॉ कॉलेजचे विधी छात्र डॉ. संजय सावंत यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यांनी महामानवांना वंदन करून म्हणाले, जगाला दया, क्षमा, शांती, अहिंसा व प्रज्ञा, शील, करुणा आणि स्वातंत्र्य , समता, बंधुत्वाचा अनेक पैलूंनी आदर्श निर्माण करणारा बौद्ध धम्म हा आजच्या घडीला एकमेव मानवतावादी, विज्ञानवादी धम्म म्हणून जगाच्या निर्देशनात आला आहे म्हणूनच या आजच्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या विश्वाला बुद्धाची तत्त्वप्रणाली ही तारणारी आहे. पुढे त्यांनी धम्म , आरोग्य, संविधान आणि रोजगार यावर प्रकाशझोत टाकून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सायंकाळी दोन दिवसीय लहान मुलांच्या, महिलांच्या कलागुणांना, मैदानी खेळातील विजेता स्पर्धकांना व शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच वकील, डॉक्टर, इंजिनिअर अभ्यासक युवक युवतींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह , सन्मानपदक , भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय, सावर्डेचे प्राचार्य प्रा. रतन कांबळे यांनी धम्म बंधू-भगिनी, तरुण वर्गाला मार्गदर्शन करताना म्हणाले, प्रत्येक बुद्धविहारे हि केवळ धम्म स्थळे न रहाता ती क्रांती केंद्र बनली पाहिजेत. क्रांती अर्थात बदल हा आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा युगातला भगवान बुद्धाच्या मनोवैज्ञानिक विचार धारेचे एक प्रमुख अंग आहे. हि विचारधारा बुद्ध धम्मातील युवा वर्गानी आत्मसात केली पाहिजे. यानंतर कोकणचे गाडगेबाबा शिवश्री काका जोयशी यांनी भटमुक्त भयमुक्त समाज या विषयावर बोलताना म्हणाले, वेद,शास्त्र ,पुराणे,स्मृती अध्याय ग्रंथाला नाकारणारे आणि अंधश्रद्धा ,कर्मकांड, आणि अनिष्ट रूढी परंपरा, बुवाबाजी, थोतांडावर प्रहार करणारे पहिले विज्ञानवादी वैज्ञानिक हे भगवान गौतम बुद्ध होते.तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जात, धर्म, वर्ण, पंथ , गोत्र आधारलेल्या समाजव्यवस्थेला 'संविधानाच्या माध्यमातून समता ,स्वातंत्र्य, बंधूभावाचा ढोस देणारे पहिले मानवतावादी विचारसरणीचे डॉक्टर होते. भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्श प्रणालीचा सर्वानी मनस्वी स्वीकार करणे ही एकमेव काळाची गरज आहे.
युगप्रवर्तक महापुरुषांच्या जयंती यशस्वी करण्याकरता स्थानिक/ मुंबई संस्थानी आणि महिला, पुरुष, तरुण वर्गातील पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन या जयंती महोत्सवाची सांगता केली .या दोन दिवसीय जयंती महोत्सवातील पहिल्या दिवसाचे सूत्रसंचालन आयु. साक्षी कदम (प्राथमिक शिक्षिका) ,आयु. प्रबोधिनी कदम (प्राथमिक शिक्षिका), धम्म उपासिका सोनाली कदम या महिला भगिनींनी केले . तर दुसऱ्या दिवशीचे सूत्र संचलन भाऊसाहेब तथा मिलिंद कदम , सन्मा. अनंत कदम गुरुजी व सामाजिक कार्यकर्ते सन्मा. संज्योत कदम यांनी केले.
0 टिप्पण्या