Top Post Ad

मुंबईत पावसाळ्या दरम्‍यानच्या व्यवस्थापनाचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई महानगरात १५ दिवस अगोदरच मान्‍सून पावसाचे आगमन झाले आहे. त्‍यातच अवघ्‍या काही तासात म्‍हणजेच कमी कालावधीत सुमारे २५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. त्‍यामुळे रस्‍ते वाहतूक धीम्‍या गतीने सुरू आहे. सखल भागात साचलेले पावसाचे पाणी उपसण्‍यात आले आहे. नालेस्‍वच्‍छता देखील वेगाने सुरू आहे. दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्‍थळी स्‍थलांतरण करण्‍याचे निर्देश महानगरपालिकेला दिले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने देखील रेल्‍वे प्रशासन, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MMRDA), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA), सैन्‍य दल,  राष्‍ट्रीय आपत्‍ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्याशी समन्वय साधून सुनिश्चित नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्‍यमंत्री तथा मुंबई शहर जिल्‍हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दिनांक २६ मे २०२५) दिले.


उपमुख्‍यमंत्री तथा मुंबई शहर जिल्‍हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दिनांक २६ मे २०२५) महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. तसेच, मुंबईत पावसाळ्यादरम्‍यान करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व आपत्कालीन व्यवस्थापन बाबींचा आढावा घेतला. त्‍यानंतर श्री. शिंदे यांनी प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींसमवेत संवाद साधला. त्‍यावेळी ते बोलत होते.  राज्‍याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव  नवीन सोना, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा,  ,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प). अभिजीत बांगर , संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन)  महेश नार्वेकर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


उपमुख्‍यमंत्री म्‍हणाले की, दरवर्षी साधारणपणे दिनांक १० जूननंतर मान्‍सूनचे आगमन होते. यंदा पहिल्‍यांदाच मे महिन्‍यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. सरासरी ५० मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना आज एकाच दिवसात २५० मिलीमीटरपेक्षा अधिक म्‍हणजेच ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. त्‍यामुळे मुंबईकर नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रस्‍ते वाहतूक धीम्‍या गतीने सुरू आहे. उपनगरीय रेल्‍वे सेवादेखील सुरळीत झाली आहे. उपनगरीय रेल्वे सेवा खंडित झाल्यास नजिकच्या रेल्वे स्थानकापासून 'बेस्ट'ची बस सुविधा उपलब्ध करावी. अतिरिक्त बस सोडाव्यात असे निर्देश देण्‍यात आले आहेत. सखल भागात साचलेले पाणी उदंचन पंपाद्वारे उपसण्‍यात आले आहे. हे उदंचन पंप बंद पडता कामा नयेत, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनास देण्‍यात आले आहेत. सर्व शासकीय,महागनरपालिका यंत्रणा सतर्क 'अलर्ट मोड' वर आहेत. शासन आणि प्रशासन एक टीम बनून नागरिकांना दिलासा देण्‍याचे काम करत आहे, असेदेखील शिंदे यांनी नमूद केले.


यंदा पाऊस वेळेआधीच सुरू झाला असला तरी नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नालेसफाई कामांवर देखरेख ठेवण्‍यासाठी यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वेच्या कल्व्हर्टखालील कचरा रोबोटच्या मदतीने स्वच्छ करण्यात येत आहे. महानगरपालिकेने दरवर्षी सखल भागात पाणी साचणारी ठिकाणे निश्चित केली असून ४२२ ठिकाणी उदंचन संच (पंप) लावले आहेत. तर २ ठिकाणी साठवण टाक्या आणि १० ठिकाणी लघू उदंचन केंद्र कार्यान्वित केले असल्याचे  शिंदे यांनी यावेळी सांगितले. दरड प्रवण क्षेत्र ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश दिले आहेत. दरवर्षी या ठिकाणी दुर्घटना घडत असल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असे निर्देश दिल्‍याचे उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी नमूद केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com