शतकातून एखादा महापुरुष जन्माला येत असतो. त्याच्या जडणघडणीत त्याच्या आईचा किंवा पत्नीचा फार मोठा वाटा असतो. सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त व्हावे म्हणून त्याची पत्नी यशोधरेने केलेला त्याग अवर्णनीय आहे राज्य, वैभव, ऐषाराम पायाशी लोळण घेत असताना तिने सिद्धार्थला दुःखाचा शोध घेण्यासाठी गृहत्याग करू दिला, त्याला प्रतिबंध केला नाही. छत्रपती शिवरायांना घडवण्यामध्ये राजमाता जिजाऊंचे योगदान कोण विसरेल ? महात्मा फुले यांच्या प्रत्येक क्रांतिकारक पावलावर सावित्रीने साथ दिली. डॉ. आंबेडकरांना मानवमुक्तीच्या लढ्यात अस्पृश्य उन्नती विषयक कार्यात सदैव साथ दिली ती त्यांच्या पत्नीने म्हणजेच रमाबाईंनी. यशोधरा जशी चंदनासारखी झिजली तशीच रमाबाई सुद्धा बाबासाहेबांसाठी अहोरात्र झिजल्या. त्यांच्या समर्पित जीवनामुळे बाबासाहेबांच्या जीवनाला व कर्तृत्वाला आकार येऊ शकला. त्याच्यामुळेच बाबासाहेब आपल्या आयुष्याचा क्षण नि क्षण समाजासाठी प्रदान करू शकले. पतीच्या कार्यातच तिने आत्मसुखाचे बलिदान करून कोट्यावधी जनतेच्या हृदयात आत्मदीप त्या प्रज्वलित करू शकल्या. त्याचे ऋण समाज कधीही विसरू शकणार नाही
डॉ. आंबेडकर आपल्या अल्पशिक्षित पत्नीला परदेशात विद्यभ्यासासाठी गेल्यावर काही पत्रे लिहिली होती. त्यात त्यांनी आलेल्या अडचणी, प्रपंचाची झालेली आबाळ, पैशाच्या अडचणी, रमाच्या आजाराची चिंता, कुटुंबातील बहिण भावंडाच्या काळजीने व्याकुळ झालेल्या मनस्थितीबाबत तिला पत्राने कळवीत असत. आजारपणात तिची सेवा करू शकत नसल्याची भावविवशता त्यांच्या पत्रातून दिसते . महापुरुषाला सुद्धा हळवे मन असते. कधी कधी दुःख अनावर झाले तर बाबासाहेब ओक्साबोक्सी रडत असत. दुःखाला वाट काढून देत असत. पत्नीशी राग किंवा अबो ला धरित असत. तेव्हा काही वेळा आपल्या कार्यालयात जाऊन बसत. घरी जात नसत त्यावेळी रमाईची काय अवस्था होत असेल ? ते स्त्री ह्रदयाशिवाय कोणाला कळणार? सतत पुस्तकात गढून गेलेल्या आपल्या पतीला पाहून त्या कधीकधी चिडून म्हणत ‘ पुस्तकात असं काय लिहिले आहे का की संसाराला जे लागतं ते बघू नये ?’तेंव्हा बाबासाहेब त्राग्याने म्हणत ‘’ काय तुझी कटकट, सांग काय पाहिजे? ‘’ आणि दुसऱ्याच क्षणी ते खळखळून हसत आणि घरात चैतन्य पसरून जायचे. बाबासाहेबांनी आपल्या रामूला लिहिलेल्या अनेक पत्रांपैकी एक पत्र असे होते
’हेनरी एस किंग अंड कंपनी लंडन. पॉलमॉल २५ नोव्हेंबर २०२१
प्रिय रामू पत्र पोहोचले. आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटले. नशिबाचा ठेवा. त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही. तुझा अभ्यास चालला आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
पैशासंबंधी तजवीज करीत आहे. मी अन्नाला मोताद झालो आहे. तेव्हा मजजवळ पाठवण्यास काही नाही तरीपण तुमचा बंदोबस्त करीत आहे. वेळ जर लागला आणि तुझे पैसे संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने भरून देईन. यशवंत व मुकुंद चे शिक्षण कसे काय चालले आहे काही कळवले नाही माझी प्रकृती ठीक आहे .काही चिंता नसावी. अभ्यास काही संपला नाही . जून महिन्यात येणे होईल असे दिसत नाही. पुढे कळवीन. सखू आणि मंजुळा यांच्या संबंधी काही कळत नाही . तुला पैसे पोहोचल्यानंतर मंजुळा व लक्ष्मीच्या आईस एकेक प्रत्येकी लुगडे देणे
सर्वात खुश भीमराव ‘’
आर्थिक ओढाताणीत काटकसरीने रमाबाई संसार करीत होत्या. काड्याच्या दोन पेटया महिन्या भरात पुरवाव्या लागत.तिसरी पेटी येऊ देण्याची वेळ येऊ देऊ नका अशी साहेबांची सक्त होती. परिस्थिती ओळखून प्रसंगी गोवरया थापून कुटुंबातील सर्वाना सांभाळून घेऊन त्या संसाराचा गाडा ओढीत होत्या. बाबासाहेबांची आलेली पत्रे रमाईच्या अन्तःकरणात हिरवळ निर्माण करून जायची. त्या पुन्हा पुन्हा पत्र वाचीत असत. जणू प्रत्यक्ष साहेब्च्ह बोलत आहेत असे वाटायचं . उर्मी हुंदके अनावर व्हायचे. त्यातून त्या पत्र लिहायला घ्यायच्या . मनात भावनांची गर्दी होती.त्यातील एक पत्र खालील प्रमाणे
-------साहेबांच्या चरणी
रामूचा शीर साष्टांग दंडवत
तुमचं पत्र वाचून आनंद झाला . मी तुमच्याशी बोलते असं मला वाटलं. मामंजीचं सपन पूर्ण करण्यासाठी आपण वाटेल ते कष्ट करू . तुमी माझी काळजी करू नका . पण तुम्हा बिगर दिस काढायचं म्हणजे लय अवघड आहे उद्याच्या प्रकाशासाठी आताचा अंधार सहन करायला हवा. जेवणाचे हाल करू नका. आनंदभाऊजीचा पगार आणि माझा कामधंदा यावर घर चालत आहे. काळजी करू नका. लक्ष्मीबाई, मुकुंदा ,यशवंत, गौरा, शंकर आपली आठवण काढतात. सगळी खुशाल हायेत. तब्येतीला जपा.
तुमची रमा
---
*योगीराज वाघमारे ,सोलापूर*
0 टिप्पण्या