मुंबईचा आक्रमक सलामीवीर साहिल कोचरेकर सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. त्याची निवड 66 सुपर लीग स्पर्धेसाठी राजस्थान रॅव्हेजर्स संघात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे साहिल गेल्या १३ वर्षांपासून अखंड मेहनत करत आहे आणि सातत्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर प्रत्येक संधीमध्ये स्वतःला सिद्ध करत आला आहे. त्यामुळे तो स्काऊटिंग टीमच्या विशेष नजरेत होता आणि अखेर या स्पर्धेसाठी राजस्थान रॅव्हेजर्स संघाने त्याच्याशी थेट करार केला.
साहिलने मागील हंगामात आपल्या आक्रमक फलंदाजीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एका सामन्यात त्याने अवघ्या 44 चेंडूंमध्ये 130 धावा काढल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात एका षटकात 6 षटकार ठोकण्याची पराक्रमी कामगिरी केली होती. या दोन्ही खेळींमुळे त्याच्यावर अनेक फ्रँचायझींचं लक्ष केंद्रीत झालं आणि त्याने संधी मिळालेल्या प्रत्येक सामन्यात आपली छाप सोडली.66 सुपर लीग ही 66 चेंडूंची स्पर्धा असून यामध्ये आयपीएल, आंतरराष्ट्रीय आणि रणजीपटू सहभागी होत आहेत. अशा मोठ्या व्यासपीठावर साहिलसारख्या उगवताऱ्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळणं, हीच त्याच्या दर्जाची आणि मेहनतीची पावती मानली जाते. विशेषतः, आयपीएलच्या आगामी हंगामासाठीही ही स्पर्धा खूप महत्त्वाची ठरणार असून साहिलच्या स्फोटक फलंदाजीवर अनेक स्काऊट्स आणि फ्रँचायझींची नजर असणार आहे.
राजस्थान रॅव्हेजर्स संघाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे की, "साहिल कोचरेकर हा आमच्या संघात गेमचेंजर ठरेल, त्याचा फॉर्म आणि शैली संघासाठी फायदेशीर ठरेल. तो सध्या ज्या पद्धतीने खेळतोय, ते पाहता या स्पर्धेत तो टॉप परफॉर्मर ठरेल अशी आम्हाला खात्री आहे."
या निवडीनंतर साहिलनेही आपली भावना व्यक्त करत सांगितलं, *"ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. गेली *१३ वर्षं मी या स्वप्नासाठी मेहनत घेतोय. प्रत्येक टप्प्यावर मी स्वतःला फलंदाज म्हणून सिद्ध केलं आहे आणि आता ती मेहनत फळ देताना दिसतेय. 66 सुपर लीगमध्ये मी माझं सर्वोत्तम देईन आणि आयपीएलकडे वाटचाल करेन."
साहिलच्या या निवडीनंतर मुंबईच्या स्थानिक क्रिकेट वर्तुळात आणि चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. त्याच्या फलंदाजीचा तडाखा आता 66 सुपर लीग मध्ये बघणं चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
0 टिप्पण्या